Join us

CoronaVirus News: हायड्रॉक्सिनक्लोरोक्विन घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 2:06 AM

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे सर्वेक्षण

मुंबई : कोरोनाच्या काळात सुरुवातीपासूनच ‘हायड्रॉक्सिनक्लोरोक्विन’ हे औषध कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त असल्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात मतमतांतरे आहेत. मात्र, या औषधाची उपयुक्तता ठोसपणे सांगता येत नसल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे.मुंबईतील कोरोनाबाधित १७६ डॉक्टरांपैकी १०२ डॉक्टरांनी हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून घेतले होते. तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या डॉक्टरांमध्ये तुलनेने कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी दिसून आले आहे.असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट (एएमसी) संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये संसर्गाची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी या औषधांचा उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याच्या निष्कर्षांविषयी निश्चितपणे काही सांगता येत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १७६ डॉक्टरांमधील ४० टक्के डॉक्टर हे ३६ ते ५० वयोगटातील आहेत. या डॉक्टरांमध्ये ताप, अंगदुखी, थकवा, कफ ही सौम्य लक्षणे होती. ३८ टक्के डॉक्टर घरीच विलगीकरणात बरे झाले. १७ टक्के डॉक्टरांना श्वास घ्यायला त्रास झाला होता आणि ११ टक्के डॉक्टरांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. यांच्यातील ६७ टक्के डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक औषधे घेतली होती. २७ टक्के होमिओपॅथी आणि ५३ टक्के जणांनी जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या होत्या.या कोरोनाबाधित डॉक्टरांमध्ये ६७ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला होत्या. यामधील ८४ टक्के डॉक्टरांनी बीसीजी आणि ५६ टक्के जणांनी एमएमआर लस घेतली होती. ए रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचेही यात आढळलेले नाही. या सर्वेक्षणाविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, रुग्णालयात कोविड टास्क फोर्समध्ये काम करणारे डॉक्टर सध्या हे औषध घेत नाहीत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी या औषधाचा कोर्स सुरू केला होता त्यांनी ८-९ आठवड्यांचा कालावधी पूर्ण केला आहे.कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रॉक्सिनक्लोरोक्विन अद्याप समाविष्ट आहे. ज्येष्ठ वयोगटातील, हृदयविकाराच्या रुग्णांना हे औषध न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खासगी दवाखाने, रुग्णालयांमधील ८० टक्के डॉक्टर बाधित झाले. या डॉक्टरांना संसर्ग कोठून झाला, हे समजू शकलेले नाही. मास्क न घातल्याने संसर्ग झाल्याचे मत ३० टक्के डॉक्टरांनी नोंदविले. २० टक्के डॉक्टर सार्वजनिक सुविधांमधील असून, त्यांना विलगीकरणाची सुविधा न मिळाल्याचेही असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंटचे प्रमुख डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.सर्वेक्षणात १७६ डॉक्टरांचा समावेशया सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १७६ डॉक्टरांमधील ४० टक्के डॉक्टर हे ३६ ते ५० वयोगटातील आहेत. या डॉक्टरांमध्ये ताप, अंगदुखी, थकवा, कफ ही सौम्य लक्षणे होती. ३८ टक्के डॉक्टर घरीच विलगीकरणात बरे झाले. १७ टक्के डॉक्टरांना श्वास घ्यायला त्रास झाला होता आणि ११ टक्के डॉक्टरांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. यांच्यातील ६७ टक्के डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक औषधे घेतली होती. २७ टक्के होमिओपॅथी आणि ५३ टक्के जणांनी जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या होत्या.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या