Join us

coronavirus: रस्ते, इमारतींची कोट्यवधींची कामे थांबली; बांधकाम विभागाला लॉकडाउनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 7:26 AM

ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या निर्देशांच्या आधीन राहून २० एप्रिलनंतर काही कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मान्सूनपूर्व, तातडीच्या कामांचा समावेश आहे.

- यदु जोशी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेली रस्ते व इमारतीची अनेक कामे थांबलेली आहेत. कटेंनमेंट झोन आणि रेड झोनमध्ये मजुरांच्या एकत्रित ने-आण करण्यावर प्रतिबंध आहेत. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये कोविड-१९ साठी उभारल्या जाणाऱ्या रूग्णालयांची सातत्याने सुरू असलेली कामे वगळता इतर कामे बंदच आहेत.ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या निर्देशांच्या आधीन राहून २० एप्रिलनंतर काही कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मान्सूनपूर्व, तातडीच्या कामांचा समावेश आहे. मान्सूनपूर्व कामांची निकड लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांसाठी मान्यता दिली जाते आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण व खड्डे भरण्याची अधिकाधिक कामे करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विभागाकडून प्राथमिकता देण्यात आली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत, असे बांधकाम विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.मागील काही आठवडे मुंबई-गोवा महामार्गावर वेगाने काम करण्यात आले आहे.वित्त विभागाने सर्वच विभागांना अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३३ टक्के इतकाच निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर झालेली पण कार्यारंभ आदेश निघालेले नाहीत, ती कामे तूर्तास प्रलंबित ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. जी कामे सुरू करण्याचे आदेश जारी झाले होते, तेवढीच कामे कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या आधीन राहून सुरू राहणार आहेत.२०१९-२० आर्थिक वर्षाअखेर झालेल्या कामांची सुमारे १७०० कोटी रूपयांची देयके प्रदान होऊ शकलेली नसून, चालू वर्षाच्या निधीच्या ३३ टक्के मर्यादेपर्यंत करावयाच्या खचार्तून संबंधित कंत्राटदारांची देणी दिली जाऊ शकतील. केंद्र सरकारने वाढीव निधी दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना अधिक गती प्राप्त होऊ शकेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तीन दिवसांपासून मुंबईत विभागाच्या कामाचा आढावा घेत आहेत.राज्याचे उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे. निधीच्या कमतरतेमुळे बांधकाम विभागाच्या शेकडो कामांना फटका बसणे साहजिक आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करीत आहोत.- अशोक चव्हाण,मंत्री सार्वजनिक बांधकामबांधकाम विभागाची कामगिरीकोरोनाच्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आवश्यक होते, ते सुसज्ज वॉर्ड. गेल्या दीड पावणेदोन महिन्यात बांधकाम विभागाने अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये सुसज्ज यंत्रणा उभी केली. त्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी अहोरात्र काम करत होते. मुंबईतील सेंट जॉर्ज, जीटी, पोद्दार, मालवणी हॉस्पिटलपासून पुण्याच्या ससून, नागपूरच्या मेयो, मेडिकलपर्यंत सगळीकडे बांधकाम विभागाने यंत्रणा उभी केली. स्वत:च्या अनेक इमारती विलगीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करून दिल्या.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसरस्ते वाहतूक