मुंबई - कोरोनाने राज्य पोलीस दलातला रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे. राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या पोलीस कुटुबीयांना ५० लाख रुपये देण्याची घोषणाही देशमुख यांनी केली.
शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. त्यात, राज्य पोलीस दलातील दोन पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यानंतर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनेतशी संवाद साधला. त्यावेळी, देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, गृहमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्यु झालेल्या पोलीस कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच, या पोलीस कुटुंबीयास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचंही घोषित केलंय.
वाकोला पोलीस ठाण्यातील ५८ वर्षीय पोलीस शिपायाच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियाना मिळाली होती. मुलाने दिलेल्या माहितीत, सुरूवातीला ताप खोकल्यामुळे वडिलांना कस्तुरबा रुग्णालयात नेले होते. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना चाचणी करण्यास सांगितले. मात्र चाचणी केली नाही. पुढे स्थानिक डॉक्टर कडून उपचार सुरु झाले. ताप वाढल्याने नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे चाचणी करत त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांना कोरोनाची लागण होती, हे स्पष्ट केले गेले. त्याच संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाच्या मोबाईल क्रमांकावरील घोळामुळे कुटुंबियाशी संपर्क झाला नाही. वडिलांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांच्या मृत्यूबाबत समजले होते.