मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युच्या केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईकरांनी मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच थांबणं पसंत केलं आहे. त्यामुळे प्रदूषणात कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. दररोजच्या तुलनेत मुंबईतलं प्रदूषण आज कमी झाल्याचा अहवाल सफरनं दिला आहे. कर्मचारी घरात राहून काम करत असल्यानं मुंबईत आभाळ व हवा निरभ्र राहिली. लाेकांनी सोशल मीडियावर म्हटले, दहा वर्षांत प्रथममच आभाळ स्वच्छ पाहण्यास मिळाले.
सफरच्या अहवालात म्हटले आहे की, “ रस्त्यावर वाहनांची रहदारी नसल्यानं प्रदूषण कमी झालं असून, दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादमधील या शहरांत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण (60-80%) आणि पीएम 2.5 ((35-50 %)यांचं प्रमाणही कमी नोंदवलं गेलं आहे. योग्य हवामानाच्या स्थितीत नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी मुख्यत: उत्सर्जनाच्या मुख्य स्त्रोतांवर (वाहनांची रहदारी) अवलंबून असते. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे. बीकेसी, नेरुळ आणि वरळीतल्या प्रदूषणात कपात नोंदवली गेली आहे. परंतु कुलाबा, अंधेरी, मालाड आणि माझगाव येथील प्रदूषणाच्या पातळीत बदल झालेला नाही.
2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाच्या अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे प्रदूषणात 118 अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये कपात झालेली आहे. हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. वाहनांतून बाहेर पडणार्या धुरांमध्ये हे सूक्ष्म कण असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.