मुंबई : महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोना कोविड १९ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा शनिवारी रात्री ओलांडला. रविवारी सकाळ पर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली. नायरमध्ये १४ एप्रिल रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत ३०२ कोविड बाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. बाळांची संख्या रविवार सकाळ पर्यंत ३०६ झाली आहे; अशी माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे समन्वयक प्रा. डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे.नायरमध्ये झालेल्या ३०२ प्रसूतिंपैकी १८९ प्रसूती म्हणजेच ६३ टक्के या नॉर्मल डिलिव्हर प्रकारातील होत्या. तर उर्वरित ११३ अर्थात ३ टक्के या सिझेरियन डिलिव्हर र्प्रकारातील होत्या. प्रसूती झालेल्या ३०२ मातांपैकी २५४ मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोविडचा संसर्ग हा जन्मत: होत नाही. गररोदर स्त्रीला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपकार्तून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार कोविड बाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या ३०६ तान्हुल्यांपैकी १० नवजात शिशुची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती डॉ. सुषमा मलिक यांनी दिली.गेले दोन महिने सातत्याने मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह ७५ कर्मचाºयांचा समावेश आहे.तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सिस्टर सीमा चव्हाण, सिस्टर रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाºयांचा समावेश आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
CoronaVirus News: ३००व्या कोविडबाधित मातेची सुखरूप प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:39 AM