coronavirus: कोरोनाकाळात संकटावर मात करून दीड कोटीचे मास्क, पीपीई किटची विक्री, संतोष कांबळे यांचा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:49 AM2020-09-01T03:49:04+5:302020-09-01T03:50:40+5:30
उद्योजक संतोष कांबळे यांचा १५ वर्षांपासून धारावीत बॅग बनवण्याचा उद्योग सुरू होता. धारावीत त्यांचे लहान लहान कारखाने होते. दोन-तीन मशीनवर काम चालायचे.
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा मोठा फटका लघू-मध्यम उद्योगांना बसला आहे. पण कोरोनाच्या संकटातही वेगळा मार्ग काढत उद्योजक संतोष कांबळे यांनी मास्क आणि पीपीई किटची विक्री करून दीड कोटीचे उत्पन्न मिळवले.
उद्योजक संतोष कांबळे यांचा १५ वर्षांपासून धारावीत बॅग बनवण्याचा उद्योग सुरू होता. धारावीत त्यांचे लहान लहान कारखाने होते. दोन-तीन मशीनवर काम चालायचे. पण ते काम एकत्रित सुरू करावे म्हणून त्यांनी जानेवारीत भिवंडीत मोठा कारखाना सुरू केला आहे. त्यामध्ये १७० मशीन आहेत. येथे वर्षाला तीन दशलक्ष बॅग निर्मितीची क्षमता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात चांगला व्यवसाय झाला. पण कोरोना आल्याने मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे राहिले होते.
कांबळे यांनी कर्ज काढून कारखाना सुरू केला होता. पण लॉकडाऊन सुरू झाल्याने हप्ते कसे भरायचे, पगार कसा द्यायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण त्यामुळे कोरोनाकाळात काही तरी करून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा विचार होता.
१० एप्रिलला अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना सवलत देणारे पालिकेचे पत्रक आले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मास्क, पीपीई किटची कमतरता आहे हे सांगितले. त्यामुळे त्यांनी यासाठी मदत करण्याचे ठरवले. पण तेव्हा पीपीई किट हा शब्द हादेखील त्यांच्यासाठी नवा होता.
तर मास्क फक्त डॉक्टरांनी लावलेला पहिला होता. त्यामुळे त्यांनी त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी ४ ते ५ रुपयांना मिळणारे मास्क १५ ते २० रुपयांना मिळत होते. तसेच एन ९५ मास्क मिळत नव्हता.
मर्यादित उत्पन्न असल्याने या गोष्टींचा तुटवडा होता. मास्क
आणि पीपीई किट तयार करण्यासाठी शिलाई मशीनची आवश्यकता
होती. बॅगसाठीच्या मशीन त्यांच्याकडे उपलब्ध होत्या. त्याचा त्यांनी वापर केला. पण कच्चा माल उपलब्ध होण्यात त्यांना अडचणी आल्या. कचा माल पुरवठा करणाऱ्यांना विनंती करून तसेच परवानगी घेऊन हा माल मिळवला.
माल वाहतुकीला अडचणी आल्या, त्यामुळे साडेतीन महिने त्यांची वैयक्तिक गाडी वापरली. १० लाखांपर्यंत मास्क आणि दहा हजार पीपीई किट बनवले. त्यातून त्यांना दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
उद्योजकांची परीक्षा घेणारा हा काळ होता. तरीही अनेक उद्योजक मैदानात पाय रोवून उभे राहिले. व्यवसायात संघर्ष केला, पण कोरोनासाठी लागणारे साहित्य तयार केले चांगला व्यवसाय केला. इतर उद्योजकांनीही संकटाला खंबीरपणे सामोरे जावे. हे दिवस जास्त काळ राहणार नाहीत हळूहळू सर्व पूर्वपदावर येईल. आर्थिक नियोजन करावे लागेल. व्यवसायात शिस्त ठेवावी. पुन्हा चिकाटीने उभे राहावे. - मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, डिक्की
कोरोनाचा काळ हा सर्व उद्योजकांसाठी कठीण असा आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपल्याला त्रास होतो. पण या काळातसुद्धा तुम्ही तुमचा वेगळा मार्ग शोधून नवी संधी तयार करू शकता. - संतोष कांबळे,
उद्योजक