coronavirus: मुलाची सोनसाखळी विकून सलूनचालकाने फेडले कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:30 AM2020-07-07T03:30:41+5:302020-07-07T03:31:32+5:30
अजूनही सलूनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मुलाची सोनसाखळी विकून कर्ज फेडावे लागले, अशी खंत एका सलूनचालकाने व्यक्त केली.
मुंबई : राज्य सरकारने ‘पुनश्च हरिओम’अंतर्गत गेल्या आठवड्यापासून सलूनमध्ये केवळ केशकर्तनास परवानगी दिली आहे. परंतु अजूनही सलूनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मुलाची सोनसाखळी विकून कर्ज फेडावे लागले, अशी खंत एका सलूनचालकाने व्यक्त केली.
विक्रोळी येथील सलूनचालक महेश पवार म्हणाले, तीन महिने सलून बंद होते. मी घर आणि दुकानाच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेतले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर दुकानासाठी फायनान्स कंपनीचे वारंवार फोन आणि मेसेज येत आहेत. काहीही ऐकून घ्यायला कंपनी तयार नसल्याने कंटाळून माझी आणि मुलाची सोनसाखळी विकली आणि कर्ज फेडले, असे ते म्हणाले.
‘उत्तर काय द्यायचे?’
पुणे येथील ब्यूटीपार्लरच्या मालक अर्चना घंटाळे म्हणाल्या की, व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे, त्यामुळे बँक वारंवार फोन करत आहे. हप्ते न भरल्यामुळे दंड आकारण्यात येईल, असे बँकेचे प्रतिनिधी सांगत आहेत. त्यांचे रोज फोन येतात, त्यांना काय उत्तर द्यायचे, हेच समजत नसल्याचे घंटाळे यांनी हताशपणे सांगितले.