घर चालवण्यासाठी सलून चालकावर पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:08 AM2020-06-14T03:08:11+5:302020-06-14T03:08:23+5:30

लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद, आर्थिक समीकरण बिघडले

coronavirus salon owner keep his wife mangalsutra as mortgage due to financial crisis | घर चालवण्यासाठी सलून चालकावर पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ

घर चालवण्यासाठी सलून चालकावर पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ

Next

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती तसेच लॉकडाऊनमुळे मागील जवळपास तीन महिन्यांपासून सलून बंद असल्याने सलून चालकांना आार्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घर चालविण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आल्याची खंत सलून चालकांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल करण्यात आले असले तरी सलून चालकांना अद्याप व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे खजिनदार सतिश पवार यांनी सांगितले की, लालबाग येथील माझ्या दुकानात मी, भाऊ आणि तीन कामगार काम करतो. त्यावरच आमच्या पाच जणांच्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून दुकान बंद आहे. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आई आजारी असते, तिच्या औषधांचा खर्च आहे. गाडीचे कर्ज, घराचे कर्ज, एलआयसीचे हप्ते कसे फेडायचे या चिंतेने झोप उडाली आहे. घर खर्चासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे. माझ्यासारखीच वेळ माझ्या अन्य सहकाऱ्यांवर आली आहे, असे त्यांनी हताशपणे सांगितले.

तर, सांताक्रूझ येथील सलून चालक प्रदीप घाडगे यांनी सांगितले की, आम्ही दोघे भाऊ सलून चालवतो. पण लॉकडाऊनमुळे तीन महिने सलून बंद होते. घरात होते ते पैसेही खर्च झाले. त्यामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहोत.

सरकारकडून सापत्न वागणूक
भाजीपाला, फळविक्री किंवा अन्य दुकाने चालू आहेत. अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरणाची काळजी घेतली जात नाही. डेंटिस्टचा तर रुग्णांशी जवळून संपर्क येतो. तरीही त्यांना व्यवसायास परवानगी दिली आहे. दुसरीकडे सलून चालक अपॉइंटमेंट घेऊन केस कापणार आहेत. केस कापल्यानंतर साहित्याचे, परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे. तरीही सलून सुरू करण्यास सरकाकरडून परवानगी नाही. हे अन्यायकारक आहे, असे सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे खजिनदार सतिश पवार यांनी सांगितले.

 

Web Title: coronavirus salon owner keep his wife mangalsutra as mortgage due to financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.