मुंबई - देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक मजूर आणि कामगार त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. यामध्ये प्रवासाच्या दरम्यान त्यांना अडचणी आल्यास किंवा निवाऱ्याची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने राज्यातील सध्यस्थितीत बंद असलेल्या शासकीय, महापालिका क्षेत्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा शेल्टर होम्स म्हणून वापर करण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या दरम्यानच्या काळात त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण मंडळाचे आयुक्त यांना देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना आवश्यकता असल्यास या बंद शाळांमध्ये आसऱ्याची सोय होऊ शकणार आहे. यामुळे त्यांना होणारा त्रास कमी होऊ शकेल आणि मदतही होईल या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोबतच समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत हंगामी वसतिगृह योजना 6 ते 14 वयोगटातील पालक विद्यार्थ्यांसाठी ते स्थलांतर करतेवेळी कार्यरत आहे. मात्र राज्यातील सद्यस्थितीत काही ठिकाणी ती ही शाळांसोबत बंद ठेवण्यात आली आहे. सध्यस्थीतीत या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांअभावी शारीरिक व मानसिक गरज लक्षात घेऊन या योजनेचा लाभ त्यांना द्यावा अशा सूचनाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. सध्याच्या वातावरणात मुलांचे आरोग्य चांगले व सुदृढ असणे आवश्यक असल्याने या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व आरोग्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना ही सहसंचालक राजेंद्र पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षणाधिकारी याना दिल्या आहेत. हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची काळजी घेताना राज्य व केंद्र सरकारच्या सुरक्षिततेच्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे विशेष नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू
Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक
Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू