Coronavirus: कोरोनाचं १० रुग्ण सापडल्यानं वेसावे कोळीवाडा सील करा; आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 01:55 PM2020-04-18T13:55:16+5:302020-04-18T13:55:56+5:30
वेसावे कोळीवाड्यापाठोपाठ आनंद नगर, शास्त्री नगर, बेहराम बाग, सरदार पटेल नगर तसेच येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबईः वरळी कोळीवाड्यापाठोपाठ आता पश्चिम उपनगरातील वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे 10 रुग्ण निघाले असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड हा आता कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून एच पूर्व वॉर्डला मागे टाकत आता येथे कोरोनाचे आतापर्यंत 139 रुग्ण झाले आहेत. वेसावे कोळीवाड्यापाठोपाठ आनंद नगर, शास्त्री नगर, बेहराम बाग, सरदार पटेल नगर तसेच येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे वेसावे कोळीवाड्यासह ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कठोर निर्णय घेऊन तो परिसर सील करण्यात यावा, अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
आपण मुख्यमंत्र्यांना फोन करून ही बाब त्यांच्या कानावर घातली अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.आजच आपण या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम उपनगरात सुमारे 6 लाख लोकसंख्या असलेल्या के पश्चिम वॉर्ड मध्ये अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही मतदार संघात कोरोनाचे आता 139 रुग्ण झाले आहे. येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व पोलिसांनी नागरिकांनी घरात बसा,घरातून बाहेर पडू नका असे आवाहन सातत्याने केले आहे. मात्र नागरिक घरात बसत नाहीत, विनाकारण बाहेर फिरतात. भाजी आली की, भाजी घेण्यासाठी गर्दी करतात, काही दिवस वरण-भात, पिठलं-भाकरी खाऊन राहिले तर काय झाले असा सवाल त्यांनी केला. किमान वेसावे बाजार गल्ली ते डोंगरी गल्लीचा परिसर सील करा, मग संपूर्ण वेसावे गाव सील करा अशी मागणी आपण पालिका प्रशासन व पोलिसांना या पूर्वीच केली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे एका घरात अलीकडेच 4 रुग्ण निघाले होते. त्यात एका 64 वर्षीय रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने वरळी कोळीवाडा सील केला होता. त्याच धर्तीवर आता वेसावे कोळीवाडा सील करा, अशी मागणी येथील अनेक कोळी बांधवांनी केल्याचे आमदार लव्हेकर शेवटी म्हणाल्या.