Coronavirus : राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:21 PM2020-03-22T15:21:25+5:302020-03-22T16:14:58+5:30
Coronavirus: गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मध्यरात्रीपासून 144 कलमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.
म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे. कृपाकरून 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. गर्दी करू नका, टोळकं किंवा ग्रुपनं कुठे फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे.
Maharashtra has entered into a very sensitive & important phase of #CoronavirusPandemic so I urge people to take all precautions in the fight against this virus: Cheif Minister Uddhav Thackeray pic.twitter.com/X0iNroWkdK
— ANI (@ANI) March 22, 2020
जी लोक परदेशातून 15 दिवसांत आली, सरकार आणि महापालिकेनं त्यांच्यासाठी विलगीकरण करण्यासाठी जी काही सुविधा दिली आहे. क्वारंटाइनमध्ये राहिलेल्यांची काळजी करू नका. त्यांच्याकडे महापालिका आणि सरकारचं पूर्ण लक्ष आहे. हा विषाणू आता गुणाकार सुरू करेल, बेरजेचं हे वेगळं प्रकरण असतं, पण हा गुणाकार करतो. ज्यांच्या हातावर शिक्के मारलेले आहेत, त्यांनासुद्धा घरात वेगळं ठेवण्याची गरज आहे. सर्व गोष्टी टाळल्यास त्याचा गुणाकार टाळून वजाबाकी करू, असं आवाहनही जनतेला केलं आहे. जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद होणार असून, जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
The percentage of employees working in govt offices has been brought down to five per cent from 25 per cent. Only the people discharging essential duties will be allowed to use public transport till March 31: Maharashtra CM Uddhav Thackeray #Coronavirushttps://t.co/ySw3wZnYo9
— ANI (@ANI) March 22, 2020
अन्नधान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील. बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील. शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील. आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून 15 दिवस घराबाहेर पडू नका आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे राहा.
चाचणी केंद्रे आपण वाढवणार आहोत. 31 मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजाअर्चा सुरू राहील, पण भाविकांसाठी बंद राहतील. अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.