मुंबई – देशात कोरोना संक्रमणाच्या साखळीत आतापर्यंत ७८ हजारांहून अधिक लोक अडकले आहेत तर २ हजार ५०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २५ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९७५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे त्यामुळे अनेक उद्योगधंदे गेल्या महिनाभरापासून ठप्प पडले आहेत.
लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी होत आहे, कारखाने बंद आहेत. व्यवहार थांबलेत त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला नुकसान सहन करावं लागत आहे. अशातच कोरोनामुळे अडचणीत असलेल्या उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांची घोषणा ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा आहे असं सांगितलं.
त्याचसोबत केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला आहे.
याबाबत भातखळकरांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, 2G, 3G तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी तिजोरीचे दार थोडे किलकिले केले तरी कशाचीच गरज पडणार नाही अशा शब्दात त्यांनी चव्हाणांच्या सूचनेची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, बुधवारी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे ५ लाख ९४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. आता दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे. यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंबंधीही घोषणा होऊ शकते. मागील ६ वर्षात झालेल्या सुधारणांमुळे आज भारताची अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम व सामर्थ्यवान झाली आहे. या सुधारणा शेतीशीदेखील जोडल्या जाऊ शकतात. जेणेकरून शेतकऱ्यांना सक्षम बनवता येईल. भविष्यात कोरोना संकटासारख्या इतर कोणत्याही आपत्तीत शेतीच्या कामकाजावर कशा पद्धतीनं कमी परिणाम होईल, याचं नियोजनही केलं जाण्याची शक्यता आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!
...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी