Join us

Coronavirus: स्वतंत्र कक्षामुळे पोलिसांना लवकर उपचार मिळणे शक्य; दिवसभराची प्रतीक्षा अर्ध्या तासावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:09 AM

कोरोनासंदर्भातील मदतीसाठी दोन महिन्यांत अडीच हजार कॉल

मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबई पोलिसांची कोरोना चाचणी आणि त्यानंतर उपचार मिळविण्यासाठीची होणारी वणवण आता थांबली असून यासाठी करावी लागणारी दिवसभराची प्रतीक्षा आता अवघ्या अर्ध्या तासावर आली आहे. मुंबई पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कोविड हेल्पलाइन कक्षामुळे हे शक्य झाले आहे. शिवाय, योग्य मार्गदर्शनामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडाही घटत आहे.

मुंबईत २ हजार ६०० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ हजार ९०० हून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली; तर ३८ जणांना जीव गमवावा लागला. ६०० हून अधिक पोलिसांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनाच कोरोनाची तपासणी करण्यासाठी असंख्य अडचणी येत होत्या. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांना रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करून घेतले जात नव्हते. काही पोलिसांनी आपल्या व्यथा सोशल मीडियाद्वारे मांडल्या. अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हेल्पलाइन कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कक्षात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, दीपक रायवाडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत, शरद सरवदे, प्रकाश सुळ, हृषीकेश माळी, मदन कुºहाडे, अक्षय गोळे असे ९ जणांचे पथक तीन शिफ्टमध्ये १२/२४ तास फॉर्म्युलानुसार कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला ४ डॉक्टरांचे पथकही आहे.

सुरुवातीला दिवसाला ६० ते ७० कॉल येत होते. तर रात्रीच्या सुमारास २५ ते ३० कॉलचा समावेश असे. पोलिसांच्या अडचणी जाणून कक्षाने रुग्णवाहिकेची मागणी केली. सध्या मुंबई पोलिसांच्या दोन आणि पालिकेकडून मागवून घेतलेल्या १२ अशा एकूण १४ रुग्णवाहिका सज्ज आहेत. प्रत्येक परिमंडळाअंतर्गत एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रश्न सुटला.गेल्या दोन महिन्यांत या कक्षाला पोलिसांचे तब्बल २ हजार ४५६ कॉल आले. यापैकी १ हजार ४०८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना अवघ्या अर्ध्या तासात उपचार मिळाले. तर आतापर्यंत ७१० जणांना कोविड आरोग्य केंद्रात पाठवले गेले. एकूणच गेल्या दोन महिन्यांत १ हजार ५४ पोलिसांना कक्षामुळे जलद गतीने मदत मिळून पोलिसांची उपचारांसाठीची वणवण कमी झाली. सध्या दिवस आणि रात्री येणाऱ्या एकूण कॉलचे प्रमाण ४० ते ५० वर आले आहे.अशी होते मदत

  • कोरोनासंशयित पोलीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कॉल येताच हेल्पलाइन कक्षातील कर्मचारी रोगाची लक्षणे समजून घेतात.
  • कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती घेत, तेथे त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवून रुग्णालयात दाखल करेपर्यंत संबंधित पथक त्यांच्या सतत संपर्कात असते.
  • यासाठी एकाच वेळी ३ पोलीस आणि एक डॉक्टर कार्यरत असतात.
  • संबंधित डॉक्टरांकड़ून सौम्य लक्षण असलेल्यांना होम क्वॉरंटाइन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस