CoronaVirus : सेव्हन हिल्स रुग्णालयात आता खासगी डॉक्टरांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 09:05 PM2020-04-26T21:05:46+5:302020-04-26T21:06:49+5:30
CoronaVirus : अंधेरी मरोळ येथील रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मुंबई - कोरोनावर उपचार आणि क्वारंटाइनसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा असलेल्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील भरतीला अत्यंत कमी प्रतिसाद दिल्यामुळे आता खासगी डॉक्टरांना सेवेसाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १०० डॉक्टर आाणि २५ ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागारांची भरती केली जाणार असून रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.
अंधेरी मरोळ येथील रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी डॉक्टर, वैद्यकीय सल्लागांची कमतरता असल्याने भरतीची जाहिरात देण्यात आली होती. मात्र ६० अॅलोपॅथी डॉक्टर्सच्या भरतीसाठी केवळ फक्त एक अर्ज आला तर ३० आयुर्वेदिक डॉक्टरांच्या जागांसाठी केवळ सहा अर्ज आणि होमिओपॅथीच्या ३० जागांसाठी केवळ १६ अर्ज आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर आणि संशयित क्वारेंटाइन असणार्यांची काळजी कशी घेणार असा प्रश्न रुग्णालयासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सेव्हल हिल्स प्रशासनाने आता १०० एमबीबीएस डॉक्टर आणि २५ ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांची भरती खासगी क्षेत्रातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५०० क्षमतेचा विलगीकरण कक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या वाढली तर खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात सध्या असलेल्या क्षमतेच्या तिप्पट क्षमतेचा वॉर्ड आणि १०० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीही डॉक्टर्स आणि वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना या सेवेसाठी बोलावण्यात आले आहे. सध्या करण्यात येणारी भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आतापर्यंत सुमारे २० खासगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सेव्हल हिल्स प्रशासनाकडून देण्यात आली.