- मनोहर कुंभेजकर मुंबई : वेसावेच्या डोंगरी गल्लीतील एकाच कुटुंबातील सात कोरोना रुग्ण आता कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी आले आहेत. यामध्ये ३ वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. या कोरोनामुक्त योद्ध्या कुटुंबाने कोरोनाशी दोन हात करत यशस्वी लढा दिल्याबद्धल त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत झाले.वेसावे कोळीवाड्यात सुरुवातीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यावेळेस येथील नागरिकांवर प्रचंड दडपण आले होते. उपचार कुठे करावेत, कोण मार्गदर्शन करेल? अशा विवंचनेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना धीर देणे आणि संबंधितांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी डोंगरीकर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धावपळ केली. येथील नागरिकांना मंडळाने मार्गदर्शन केले. सुरुवातीला येथील कुटुंबातील पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन परत आला आणि आता त्याच्या कुटुंबाचे सात जण हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त होऊन आता सुखरूप घरी आले आहेत.कोरोना महामारी आणि डोंगरी गल्ली लॉकडाउन करताना गल्लीतील सर्व रस्ते आणि घर, गल्ल्या स्वच्छ आणि सॅनिटाइझ केल्या होत्या आणि हा त्यांचा उपक्रम आजही सुरू असल्याचे डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र लडगे आणि सेक्रेटरी प्रशांत चिखले यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.या धावपळीमध्ये संभाव्य रुग्णांची टेस्ट करून घेणे, त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करणे आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवक आणि क्लाराज कॉलेज आॅफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल यांनी बहुमोल सहकार्य केल्याची भावना वेसावे मच्छीमार सहकारी सोसायटी लि.चे अध्यक्ष महेंद्र लडगे यांनी व्यक्त केली.शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि के वेस्टचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिल पटेल यांनी वेळोवेळी वर्सोवा पोलीस विभाग, के पश्चिम वॉर्डचे पालिका अधिकारी यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी रुग्णांना तात्काळ भरतीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. वेसावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका खोपडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर आजही कोरोना रुग्ण तपास यंत्रणांना सहकार्य करणे, लॉकडाउनची अंमलबजावणी करणे यासाठी हे मंडळ परिश्रम घेत आहे, अशी माहिती महेंद्र लडगे यांनी शेवटी दिली.बहुमोल सहकार्यसंभाव्य रुग्णांची टेस्ट करून घेणे, हॉस्पिटलमध्ये भरती करणे आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवक आणि क्लाराज कॉलेज आॅफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल यांनी बहुमोल सहकार्य केल्याची भावना महेंद्र लडगे यांनी व्यक्त केली.
coronavirus: एकाच कुटुंबातील सात रुग्ण झाले कोरोनामुक्त, टाळ्या वाजवून केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 3:28 AM