Join us

coronavirus : राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 2:06 PM

मुंबईत पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - महाराष्ट्रावरील कोरोना विषाणूचे सावट अधिकच गहिरे झाले आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना आता राज्यात कोरोनामुळे सातवा मृत्यू झाला आहे. मुंबईत पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 193 वर पोहोचला आहे.

दुसरीकडे राज्यातील कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज अजून काही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. पुणे 5, मुंबई 4 तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले आहेत. तत्पूर्वी शनिवारी राज्यात आणखी ३३ कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली होती. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे, पुण्याचे ४, जळगावचा १, तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील चार रुग्ण आहेत. सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई