Coronavirus:...तर राज्यात दोन सत्ताकेंद्र होणार नाही; राज्यपालांविरुद्ध शरद पवारांची नरेंद्र मोदींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:17 PM2020-04-08T17:17:19+5:302020-04-08T17:32:45+5:30

कोरोनाचे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे.

Coronavirus: Sharad Pawar complains to PM Narendra Modi about State Governor pnm | Coronavirus:...तर राज्यात दोन सत्ताकेंद्र होणार नाही; राज्यपालांविरुद्ध शरद पवारांची नरेंद्र मोदींकडे तक्रार

Coronavirus:...तर राज्यात दोन सत्ताकेंद्र होणार नाही; राज्यपालांविरुद्ध शरद पवारांची नरेंद्र मोदींकडे तक्रार

Next
ठळक मुद्देकोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही. हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावाशरद पवारांनी केली नरेंद्र मोदींकडे मागणी

मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिग्गज नेते आणि खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली.

याबाबत शरद पवार म्हणाले की, राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असं मत त्यांनी मांडले.

त्याचसोबत देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे बर्‍याच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे अशी सूचना पवारांनी नरेंद्र मोदींकडे मांडली. कोरोनानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्रसरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा. ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी अशी विनंती पवारांनी केली.

दरम्यान, कोरोनाचे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही. समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: Coronavirus: Sharad Pawar complains to PM Narendra Modi about State Governor pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.