Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:31 AM2020-03-24T07:31:16+5:302020-03-24T07:32:52+5:30

रविवारी संध्याकाळी देशभरात थाळी-संगीतासाठी झालेली गर्दी व उत्सवी वातावरण पाहून इतरांची भीती मेली. कोरोना वैगेरे झूट असल्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागला.

Coronavirus: Shiv Sena asks questions to PM Narendra Modi on Corona issue seriousness pnm | Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल

Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल

Next
ठळक मुद्देलोकांनाही चिंता, गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय? परदेशी विमानांतून दिल्लीत सरकारचे जावई येणार आहेत काय?राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय राहिला नाही तर कोरोनाचे तांडव वाढतच जाईल.

मुंबई - मुंबई-पुण्यासारखी शहरे ‘लॉकडाऊन’ असूनही महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. पंतप्रधान मोदी यांनी आता चिंता व्यक्त केली आहे. काय तर ‘लॉकडाऊन’ला जनता गंभीरपणे घेताना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. चिंतेची बाब तर आहेच कारण लोकांच्या मनात भीती, दहशत असेल तरच लोक एखादी गोष्ट गांभीर्याने घेतात. लोकांच्या मनात भीतीचा व्हायरस घुसत असतानाच पंतप्रधानांनी सांगितले, लोकांनी घराच्या बाल्कनीत वगैरे येऊन थाळीनाद करावा व कोरोनाशी झुंज देणाऱ्या आरोग्य सेवकांचे मनोधैर्य वाढवावे. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी नाचत, उड्या मारीत रस्त्यावर उतरल्या व या सगळ्या प्रकारास एक प्रकारे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य घालवले कोणी? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

रविवारी संध्याकाळी देशभरात थाळी-संगीतासाठी झालेली गर्दी व उत्सवी वातावरण पाहून इतरांची भीती मेली. कोरोना वैगेरे झूट असल्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागला. मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर सोमवारी सकाळी वाहनांची तोबा गर्दी झाली. ही गर्दी कुठे निघाली आहे? पंतप्रधानांचे आवाहन, 144 कलम, कोरोनाची भीती याला न जुमानता या गर्दीचा ओघ कोठे निघाला आहे? पंतप्रधान चिंतेत आहेत. आम्ही पंतप्रधानांच्या चिंतेत सहभागी आहोत. लोकांनाही चिंता, गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय? असंही शिवसेनेनं सांगितले आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

राजकीय पक्षाचे लोक हाती थाळ्या, झेंडे घेऊन चौकाचौकात उतरून घोषणा देऊ लागले. सरकारने 144 कलम लागू केले त्याची अशा प्रकारे ऐशी की तैशी करणारे आपणच आहोत. आता राज्य सरकारने जे लॉकडाऊन जाहीर केले आहे त्याचे तरी शिस्तीने पालन करून सरकारी यंत्रणेला सहकार्य करणे हे जनतेचे कर्तव्यच आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करण्याचे आदेश दिले. दिल्लीच्या सीमा सील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली विमानतळ बंद असेल असे त्यांनी जाहीर केले. केजरीवाल योग्य तेच करीत होते, पण लगेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले, ‘‘विमानतळे चालूच राहतील. परदेशातून विमानांचे लँडिंग होईल.’’ त्यामुळे पुन्हा गांभीर्याचे बारा वाजले. परदेशी विमानांतून दिल्लीत सरकारचे जावई येणार आहेत काय?

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय राहिला नाही तर कोरोनाचे तांडव वाढतच जाईल. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 74 वरून 89 वर पोहोचली. त्यात मुंबई आघाडीवर आहे. हे लक्षण धोकादायक आहे. पण काल हेच मुंबईकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे सरकारी आदेश होते ते मोडण्यात आले.

दिल्लीत तर जणू कोरोनाच्या नावाने दिवाळीच साजरी केली. जणू एखादा विश्वचषक जिंवूâन आले व त्याचा विजयी जल्लोष सुरू आहे. मोदी यांना हा सर्व उत्सवी प्रकार अपेक्षित नसावा. सरकार सर्व परिस्थितीशी सामना करायला तयार आहे, असे सांगत असले तरी न्यूयॉर्क, लंडन, स्पेनप्रमाणेच आपण हतबल झालो आहोत का?

‘एम्स’ या हिंदुस्थानातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या डॉक्टर्स मंडळींनी त्यांच्या संचालकांना एक पत्र लिहिले व ‘उत्सवी’ मंडळीचा ‘मास्क’ उतरवला आहे. कोरोनाचा सामना करायला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे ‘एम्स’चे डॉक्टर्स सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या संस्थांकडे शस्त्रे नाहीत, आयुधे नाहीत व ते निःशस्त्र लढत आहेत असे समजायचे काय?

कोरोनाविरोधात युद्ध आहे. युद्धात डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक बिनहत्यार लढत असतील तर कसे व्हायचे? हे चित्र देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आहे. एम्स (AIIMS) ही केंद्र सरकारची संस्था आहे हे लक्षात घेतले तर आरोग्य मंत्रालयाने अधिक गांभीर्याने लढण्याची गरज आहे.

जर्मन चॅन्सलर अँजेला मॉर्वेल यांना ‘कोरोना’ची लागण झाली व त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जगभरातील ही एकूणच परिस्थिती पाहता पंतप्रधानांनी असे सांगितले आहे की, कोरोनाच्या भयाने माझे अनेक भाऊ-बहीण हे रोजीरोटीचे गाव सोडून मूळ गावी निघाले आहेत. त्यामुळे गर्दी वाढत आहे. प्रवासात गर्दी वाढली तर कोरोनाचा धोकाही वाढेल. त्यामुळे तुम्ही आहात तेथेच राहा. त्यातच तुमची सुरक्षा आहे. थोडक्यात, पंतप्रधानांना असे सांगायचे आहे घरीच थांबा. गर्दी करू नका!

Web Title: Coronavirus: Shiv Sena asks questions to PM Narendra Modi on Corona issue seriousness pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.