मुंबई - राज्यभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पंचवीस हजारांवर पोहोचला आहे व त्यात पोलिसांची संख्या 1 हजार 25 वर जाऊन पोहोचली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या चोवीस तासांतच 225 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात 106 अधिकारी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापुरात कोरोनाग्रस्त पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाने मरण पावलेल्यांना खांदा द्यायला त्यांच्याच आप्त, मित्र परिवाराने नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्या कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार केले. अशा पोलिसांचे मनोबल वाढवायला हवे. पोलिसांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा खोचक सल्ला सामना अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.
कोणी काही म्हणोत, पण निदान महाराष्ट्रात तरी खरे कोरोना योद्धे हे पोलीस, डॉक्टर्स व परिचारिका आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे व योद्ध्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. पोलिसांना उसंत नाही, विश्रांती नाही, ते अहोरात्र झुंज देत आहेत. कोरोनासारखा एक विषाणू पोलीस खातेही हतबल करताना दिसत आहे. पोलिसांसारख्या मजबूत संस्थांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होणे, त्यातून या दलाचे मनोधैर्य खचणे महाराष्ट्राच्या परंपरेस परवडणारे नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- मुंबईच्या पोलिसांनी भल्याभल्या गुंडापुंडांना सरळ केले आहे. अनेक चोर-लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. हिंस्र दंगलखोरांना आपले पोलीस बेडरपणे सामोरे गेले आहेत. प्रसंगी जीवाची बाजी लावली आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य नेहमीच चोख बजावले आहे. एकट्या मुंबई शहरातच चारशे पोलीस कोरोनाने त्रस्त आणि ग्रस्त आहेत.
- पोलीस आणि सैनिक हा ‘Disciplinary force’ आहे. म्हणजे आदेश व शिस्त पाळणारा फोर्स आहे. जनतेच्या, राष्ट्राच्या संरक्षणासाठी ते सदैव सज्ज आहेत. आज कोरोना संकटातही सिक्कीमच्या सीमेवर आमचे सैनिक घुसखोरी करणाऱ्य़ा चिनी सैनिकांना भिडत आहेत. त्यांना इंच इंच मागे रेटत आहेत. कश्मीर खोऱ्य़ात सैनिक दहशतवाद्यांशी लढत आहेत. अर्थात, हा शत्रू समोर दिसणारा आहे आणि त्याच्या मस्तकावर, छाताडावर गोळी मारण्याची हिम्मत आमच्या सैनिकांत आहे, पण पोलिसांना कोरोना नावाच्या अदृश्य शक्तीशी लढावे लागत आहे.
- कोरोना विषाणू पोलिसांच्या शरीरात घुसतोय व त्यांचा बळी घेतोय. हे देशभरातच सुरू आहे. दिल्ली पोलिसांनाही कोरोनाने ग्रासले आहे. दीडशेच्यावर दिल्ली पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. याशिवाय निमलष्करी दलांतही कोरोना घुसला आहे. आतापर्यंत निमलष्करी दलांच्या हजारावर जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, ही चिंतेची बाब आहे.
- सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एएसबी दलांचे जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर आपण सगळे आहोत ते पोलीस दल कोरोना विषाणूच्या हल्ल्याने बेचैन झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांविषयी सहानुभूती, संवेदना वगैरे व्यक्त केली.
- राज्यातील पोलिसांना थोडी विश्रांती देऊन केंद्राकडून अधिकचे मनुष्यबळ महाराष्ट्रात मागवावे असे त्यांचे मत आहे व ते चुकीचे नाही, पण जे केंद्रीय सुरक्षा बल राज्याला हवे आहे त्यातही कोरोनाने घुसून सगळ्यांना हवालदिल करून सोडले आहे.
- महाराष्ट्राच्या तुरुंगांवर कोरोनाने भयंकर हल्ला केला आहे व ज्या ऑर्थर रोड तुरुंगाच्या भिंती कसाबसारख्या दहशतवाद्याची मिजास उतरवत होत्या, त्या मजबूत भिंतीच्या पलीकडेही कोरोनाचे थैमान सुरू आहे. शंभरावर कैदी व तुरुंग कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
- पोलीस खात्याचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांना हे आव्हान आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढवायलाच हवे, पण पोलिसांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे एखाद्या हिम्मतबाज मर्दासारखे सामान्य पोलीस शिपायांसोबत मैदानात आहेत.
- धारावीसारख्या हॉटस्पॉटमध्ये पोलीस आयुक्त स्वत: जात आहेत, पण सामान्य पोलीस अशा ठिकाणी चोवीस तास झुंजतो आहे व तेथेच हा विषाणू पोलिसांवर हल्ला करीत आहे. गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण राखण्याचे काम पोलिसांना करावे लागते. त्यातून पोलिसांना गर्दीत घुसावे लागते. अशावेळी काही ठिकाणी पोलिसांवर हल्लेही झाले आहेत.
- मजूरवर्ग जो हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपापल्या राज्यात पायी निघाला आहे त्यांना रोखण्याचे, प्रसंगी बळाचा वापर करून थांबविण्याचे कामही पोलिसांना करावे लागत आहे. त्या गर्दीतून सुटलेले विषाणूबाणही पोलिसांचे घात करीत आहेत व हे सर्व संकट पोलीस महाराष्ट्रासाठी छाताडावर झेलत आहेत.
- पोलीस खाते हे राजकारण्यांसाठी दरारा निर्माण करणारे आहे, पोलिसांना चिरीमिरी लागते आदी आरोप करणे सोपे आहे. डहाणूच्या साधू हत्याकांडात सगळ्यात जास्त सोसावे लागले ते पोलिसांनाच. कुठे काही खट्ट वाजले तरी पोलिसांना सरळ धोपटले जाते, पण आज तोच पोलीस जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढतो आहे.
- अभिनेता जितेंद्र जोशी याने कोरोना रणातील झुंजार पोलिसांना मानवंदना देणारे एक गाणे रचले व लोकांसमोर आणले ते उत्तमच आहे. कोरोनाच्या लढाईत जनतेला वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्य़ा पोलिसांना वाचवायला हवे!