मुंबई - राज्यावर कोरोनाचे संकट आले असताना सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेनेने विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात पालघर येथे साधूंच्या झालेल्या हत्येवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्याला आजच्या सामानातील अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महाराष्ट्रात साधूंची हत्या करणारे फासावर जातील. पण इतर राज्यात जे भूकबळी आणि झुंडबळी जात आहेत, त्याचे काय ते बोला, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. ही फेक न्यूज नाही, असा टोलाही भाजपाला लगावला आहे.
मॉब लिंचिंग, झुंडबळी कुठे होतील याचा भरवसा नाही, उत्तर प्रदेशातील घटना महाराष्ट्रातील डहाणूपेक्षाही भयंकर आहे. अन्नाच्या शोधात असलेल्या एका गरिबाला जमावाने ठेचून मारले. वाचवायला गेलेल्या पोलिसांनाही मारहाण झाली. महाराष्ट्रात दोन साधूंसह तीन जणांची हत्या झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी चिंता व्यक्त केली होती. ती योग्यच आहे. समाजात बेरोजगारी आणि भविष्यातील चिंतेने भावनांचा उद्रेक होत आहे. त्यातून चिंता वाढत आहे. पालघरमधील घटना हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण करू नये. पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी आहे. कोरोना युद्धच्या धुरावर स्वतःच्या भाकऱ्या शेकवित आहेत, असा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने लगावला आहे. तसेच अर्णव गोस्वामी प्रकरणावरही समानातून नाव न घेता टीका करण्यात आली आहे. फेकन्यूजवाल्यांवरील हल्लेही फेक ठरतात. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू असलेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.