Coronavirus : धक्कादायक! गोरेगावच्या हॉटेलमधून ७५ कोरोना संशयितांना सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:06 PM2020-03-23T15:06:19+5:302020-03-23T15:17:21+5:30

होम कोरंटाईनचा होता हातावर शिक्का, निष्काळजीपणाबाबत चौकशीची मागणी

Coronavirus : Shocking! 75 Corona suspects released from Goregaon hotel pda | Coronavirus : धक्कादायक! गोरेगावच्या हॉटेलमधून ७५ कोरोना संशयितांना सोडले

Coronavirus : धक्कादायक! गोरेगावच्या हॉटेलमधून ७५ कोरोना संशयितांना सोडले

Next
ठळक मुद्देपरदेशातून भारतात आल्यानंतर कोरोनाचे संशयित असल्याने 'होम कोरंटाइन' चा शिक्का मारलेल्या जवळपास ७५ लोकांना गोरेगावच्या एका हॉटेलमधून कालावधी पूर्ण होण्याआधीच सोडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तहसीलदारांनी या संशयित प्रवाशांची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती त्याचे दिवसाचे भाडे साडे तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. गोरेगावामधील एका नामांकित हॉटेलमध्ये दुबईतून आलेल्या ७५ जणांना ठेवण्यात आले होते.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: कोरोना या घातक विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांनी घराबाहेर पडू नये असे सक्त आदेश आरोग्य मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही परदेशातून भारतात आल्यानंतर कोरोनाचे संशयित असल्याने 'होम कोरंटाइन' चा शिक्का मारलेल्या जवळपास ७५ लोकांना गोरेगावच्या एका हॉटेलमधून कालावधी पूर्ण होण्याआधीच सोडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल तसेच अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरत आहे.

गोरेगावामधील एका नामांकित हॉटेलमध्ये दुबईतून आलेल्या ७५ जणांना ठेवण्यात आले होते. १९ मार्च, २०२० च्या पहाटे पाचच्या सुमारास हे लोक मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांना तहसीलदार यांच्या निर्देशानुसार, संबंधित हॉटेलमध्ये हलविण्यात आले. ट्रॅव्हल हिस्ट्रीमुळे कोरोना संशयित असलेल्या या लोकांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आला होता. त्यानुसार १४ दिवस त्यांना त्याच हॉटेलमध्ये ठेवणे बंधनकारक होते. मात्र या सर्वांना अवघ्या तीन ते चार दिवसातच सोडून देण्यात आले. हे सर्व सुलतानपूरचे राहणारे होते असे सूत्रांचे म्हणणे आहे. हॉटेलमधून ते खासगी वाहन तसेच ओलामधून  त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. तर काहींना पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा विमानतळावर पाठविण्यात आले. मात्र घरी जाण्यासाठी त्यांनी रेल्वे अथवा ज्या मार्गाचा अवलंब केला असेल त्या मार्गावरील अन्य लोकांच्या,ओला किंवा खासगी वाहनचालक तसेच पोलिसांच्या जीवाला यामुळे मात्र धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गावात गेल्यानंतर त्यांनी याबाबत कोणाकडे वाच्यता न करता निष्काळजीपणा केला तर अन्य गावकऱ्यांचे आयुष्यही यामुळे धोक्यात आले आहे. मुळात संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांनी या सगळ्याची काळजी घेणे अपेक्षित होते, मात्र त्यांचेही वागणे याप्रकरणी हलगर्जीपणाचेच असल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे. त्यानुसार आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

'पैसा कौन भरेगा' ?
तहसीलदारांनी या संशयित प्रवाशांची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती त्याचे दिवसाचे भाडे साडे तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे त्या ७५ जणांना १४ दिवसांचा खर्च परवडणारा नव्हता. त्यावरुन हॉटेल व्यवस्थापन आणि या संशयितांमध्ये वाद झाले. तसेच हॉटेलमध्ये राहणारे अन्य ग्राहक तसेच कर्मचाऱ्यामध्येही यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी हॉटेलमधून हे संशयित बाहेर निघून गेल्याची माहिती आहे.

मला काहीच माहीत नाही !
'मला फक्त जिल्ह्याधिकारी कार्यालयातून आदेश आले होते की, ७५ प्रवाशाच्या राहण्याची सोय करायची आहे. त्यांना मी पाहिलेही नाही. त्यामुळे मला याबाबत काहीच माहीत नाही.
अमरसिंग पाटील सावंत ( तहसीलदार )

'आम्ही आदेशांचे पालन केले' !
'आम्हाला तहसीलदार कार्यालयातून याबाबत आदेश आले होते. त्यानुसार आम्ही त्याचे पालन केले'.
( गीतेंद्र भावसार - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस स्टेशन )

Web Title: Coronavirus : Shocking! 75 Corona suspects released from Goregaon hotel pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.