Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे वडाळा आगरातील बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 04:06 PM2020-04-15T16:06:32+5:302020-04-15T16:07:04+5:30
देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक सेवा बंद केली आहे.
मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील काही डॉक्टर्सना, पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेमधील बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.
देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक सेवा बंद केली आहे. तर खासगी वाहतूक सेवाही लॉकडाऊनमध्ये बंद आहे. अशातच आरोग्य कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी बेस्टचा वापर केला जात आहे. मात्र बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारातील कोरोना बाधित कर्मचाऱ्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती आहे.
कोरोनाची लागण झालेल्या बेस्टच्या पुरवठा विभागातील कर्मचारी २६ मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. १८ आणि १९ मार्च या दोन दिवसांच्या सुट्टीत तो गावी जाऊन आल्यानंतर २० मार्च रोजी हुतात्मा चौक रिसिविंग स्टेशनवर त्याने काम केले. २१ मार्च रोजी वडाळा बस आगारातील वाहतूक प्रशिक्षण केंद्रात त्याने हजेरी लावली होती. मात्र २२ मार्चपासून ताप येत असल्याने त्याने कामावर येणे बंद केले होते.
त्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे उजेडात आल्यानंतर त्याच्या विभागात काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. वडाळा बस आगारातील पुरवठा विभाग बंद करून तिथे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मात्र यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अनेकदा डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या गर्दीचे फोटोही व्हायरल झाले होते. काही कर्मचाऱ्यांनी इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी बोलावण्याची गरजदेखील नाही असंही सांगितले होते.