Coronavirus: सोलापुरातील धक्कादायक प्रकार; कोरोनाग्रस्त बाळंतीणीला बसविले दिवसभर बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:20 AM2020-05-06T03:20:59+5:302020-05-06T03:21:20+5:30
साडेसहा तासांनी केले दाखल
सोलापूर : अवघ्या दहा दिवसांच्या बाळंतीणला केगाव येथील क्वारंटाइन विभागात ठेवल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आत घेण्यास नकार दिला, दिवसभर बाहेर बसविले. तब्बल साडेसहा तासांनंतर तिला अॅडमिट केल्याचा प्रकार मंगळवारी घडला.
पाच्छा पेठेतील एक महिला प्रसूतीसाठी २४ एप्रिल रोजी शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती़ त्या दिवशी तिला मुलगी झाली. प्रसूती झाल्यानंतर तिला २८ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. महिला घरी आली मात्र तिच्या मोठ्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे संपर्कातील नातेवाईकांमध्ये बाळंतीण, नवजात मुलगी, तिचा पती, दीड वर्षाचा मुलगा व दीर अशा पाच लोकांना अॅम्ब्युलन्समधून दि. १ मे रोजी केगाव येथील क्वारंटाइन विभागाने नेले.
तिथे सर्वांचे स्वॅब घेण्यात आले़ त्याचा अहवाल ५ मे रोजी मिळाल्यानंतर बाळंतीणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता अॅम्ब्युलन्समधून शासकीय रूग्णालयात सोडून चालक निघून गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. ‘तुला इथे कोणी आणले आहे, त्यांना येऊ दे मग बघू’, असे सांगून तिला व नवजात बाळाला बाहेर जाऊन बसण्यास सांगितले. ओली बाळंतीण १० दिवसांचे बाळ पोटाशी धरुन रुग्णालयाबाहेर दगडी भिंतीला टेकून बसली होती. महिलेचे मामा रूग्णालयात आले, त्यांनी विचारणा केल्यावर ‘तुझ्या नातेवाईकास घरी घेऊन जा’, अशी उर्मट भाषा वापरण्यात आली. शेवटी गोंधळ जास्त होतोय हे लक्षात आल्यानंतर बाळ-बाळंतिणीली अॅडमीट करून घेतले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
रूग्ण दाखल झाल्यानंतर त्याची जी रितसर कार्यवाही असते ती पूर्ण झाली नसेल, त्यामुळे काही वेळ झाला असेल. मी माहिती घेऊन काय झाले होते ते पाहतो. - डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर.