Coronavirus: जुलैमध्ये शुटिंग सुरू होण्याची शक्यता; अभिनेत्रींनी घरुन मेकअप करून यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:10 AM2020-05-06T03:10:50+5:302020-05-06T07:15:09+5:30
सोमवारी सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइजच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली़
अजय परचुरे
मुंबई : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु होताच राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिल्याने मनोरंजन उद्योगानेही शूटींग पूर्ववत सुरु करण्याच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. जुलै महिन्यात चित्रपट आणि मालिकांचे शुटिंग सुरू करण्याच्या दृष्टिने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सेटवर सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देणे, अभिनेत्रींनी घरूनच मेकअप करून यावे अशी नियमावलीच सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) तयार केली आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मनोरंजन उद्योग ठप्प पडला़ नव्या मालिकांचे, सिनेमांचे शूटींग थांबले, आगामी सिनेमांचे प्रदर्शनही रोखले गेले़ मात्र आता लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता बघता, मनोरंजन उद्योगाच्या जीवात जीव आला आहे़ केवळ इतकेच नाही तर येत्या दिवसांत शूटींग सुरु झाल्यानंतर शूटींगची योजनाही तयार झाली आहे़ येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळू शकेल, अशी आशा मनोरंजन विश्वाला वाटतेय़ ही परवानगी मिळालीच तर अनेक निबंर्धासह शूटींग सुरु होणार आहे़
सोमवारी सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइजच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ या बैठकीत येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली़ शिवाय या पार्श्वभूमीवर सेटवरच्या संभाव्य बदलांवरही चर्चा झाली़ काही सुरक्षा निर्दशांचे पालन करून चित्रपट व मालिकांचे शूटींग सुरु करता येईल, यावर या बैठकीत एकमत झाले़ अर्थात अधिकृतपणे याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही़ सिंटाचे सचिव अमित बहल यांनी सांगितल्यानुसार, पहिल्या बैठकीत केवळ सूचना केल्या गेल्या़ अद्याप काहीही ठरलेले नाही़ राज्य सरकारने परवानगी दिल्याशिवाय काहीही निर्णय घेता नाही़ मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्यपरिषद यासर्वांसोबत चर्चा करूनच काही गोष्टी ठरवल्या जातील़
असे असू शकतात नवे निर्बंध
- लॉकडाऊननंतर शूटींग सुरु झाल्यास सेटवर आलेल्या प्रत्येकाची स्वॅब टेस्ट होईल़
- सेटवर सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल़
- प्रत्येक सेटवर एक डॉक्टर आणि नर्सचे पथक तैनात असेल़
- निर्मात्याने १२ तासांच्या शिफ्टमध्ये सेटवरच्या प्रत्येकाला चार मास्क पुरवावेत़
- अॅक्टर्सनी आपले मेकअप घरूनच करून यावे़
- चित्रपट व मालिकांच्या लीड हिरो वा हिरोईनची अख्खी टीम सेटवर नेण्याची परवानगी नसेल़ त्यांचा केवळ एकच माणूस सेटवर असेल़
- शूटींग सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत ६०वर्षांवरील कुठलाही कामगार व कर्मचारी सेटवर काम करणार नाही़
- प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक असेल़