Coronavirus : कोरोनामुळे नवी मुंबईत शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:33 AM2020-03-21T03:33:40+5:302020-03-21T03:35:02+5:30
पनवेल पालिका हद्दीत कामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने जिल्हा पातळीवर प्रशासनाची तारांबळ उडाली. परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या पनवेल शहरात मोठी असल्याने खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता हॉटेल्स, मॉल्स, मटण-चिकनची दुकाने, मोबाइल शॉप, हार्डवेअर, सराफा दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे नागरिक तसेच दुकानदारांकडून पालन करण्यात आल्याने शुक्रवारी पनवेल पालिका हद्दीत कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.
पनवेल पालिका हद्दीत कामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने जिल्हा पातळीवर प्रशासनाची तारांबळ उडाली. परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या पनवेल शहरात मोठी असल्याने खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल शहर आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
या वेळी पालिकेने स्थापन केलेले पथक बंदचा आढावा घेत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने परदेशातून आलेल्या नागरिकांना खारघर शहरातील ग्रामविकास भवनामध्ये स्थापन केलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण केंद्रात ४४ जणांना ठेवण्यात आले आहे. काहींना स्वत:च्या घरातच विलगीकरण केंद्रात थांबण्याच्या सूचना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
खारघर शहरात डी-मार्ट सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप येथील भाजपचे पदाधिकारी समीर कदम यांनी केला. विशेष म्हणजे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत खबरदारीही घेण्यात आली नव्हती. पालिकेने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाºया दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.
पालिकेने केलेल्या आवाहनाला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरातील नागरिकांनी बंदचे महत्त्व लक्षात घेता घराबाहेर पडण्याचे टाळले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून प्रशासनाला अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल शहरासह ग्रामीण भागातदेखील शुकशुकाट दिसून येत आहे. तालुक्यात १७० हून अधिक गावे आणि वाड्या आहेत. बँकांमध्येदेखील गरज असेल तरच या, अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्रासमोरदेखील गर्दी करू नये, असे वारंवार सांगितले जात आहे. तालुक्यातील घरांची कामे ठप्प आहेत. ज्वेलरीची दुकाने बंद आहेत.
उरणमधील बाजारपेठ बंद
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उरण शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवल्या. अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकल स्टोअर्स, किराणा माल आणि दूध व भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. उरण शहर आणि तालुका परिसरातही जमाव होईल, अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी परवानगी नाकारली आहे.
नवी मुंबईमधील पानटपऱ्यांसह खाऊगल्ल्याही बंद
1महापालिकेच्या आदेशानंतर शहरातील सर्व पानटपºया व खाऊगल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाशीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकातील सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, उद्याने, सभागृहे, क्रीडा संकुले, जलतरण तलाव व व्यायामशाळा बंद करण्यात आल्या आहेत. पानटपºया व खाऊगल्ल्याही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सर्व टपºया व
अपवाद वगळता सर्व खाऊगल्ल्या बंद होत्या.
2उघड्यावर थुंकणाऱ्यांविरोधातील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता अधिकारी व निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविली आहे. तीन दिवसांमध्ये जवळपास सव्वाशे जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २६ हजार २५० रुपये दंड वसूल केला आहे. गुरुवारी सायंकाळी वाशी सेक्टर ९ मध्ये कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. यामुळे महानगरपालिकेने चार फेरीवाल्यांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
विभाग अधिका-यांची नियुक्ती
शहरातील पाळणाघरे, महिला सक्षमीकरण केंद्रे, सभा, बैठका यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विभाग अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.