संदीप शिंदे
मुंबई : सिंगापूरची अर्थव्यवस्था तगडी असली तरी या देशात अन्नाचा एक कणही पिकत नाही. पाणी, भाजीपाला, दूध, अन्नधान्य प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आयातच करावी लागते. बँकिंगपासून ते कायदेशीर सल्लागार संस्थांपर्यंत आणि सर्व्हिस इंडस्ट्रीपासून ते शिपिंगपर्यंतच्या असंख्य आंतरराष्ट्रीय उलाढालींचा केंद्रबिंदू याच देशात आहे. मात्र, या अर्थव्यवस्थेची मुळे ज्या देशांमध्ये रूजली आहेत ते आज ‘कोविड-१९’ या भयंकर आजारामुळे बेजार आहेत.
सिंगापूरने कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवला आहे. परंतु, इतर देशांतील संसर्गाबाबत हा देश जास्त चिंतित आहे. कारण इतर देशांत या विषाणूचा फैलाव जास्त प्रमाणात झाल्यास या देशाला मोठ्या आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागू शकतो. सिंगापूर येथील वित्तीय संस्थेत कार्यरत असलेल्या अस्मिता जामखंडीकर यांनी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना ही भीती व्यक्त केली. सिंगापूरची जेवढी लोकसंख्या आहे, त्याच्या तिप्पट आंतरराष्ट्रीय प्रवासी व्यवसायाच्या निमित्ताने वर्षभर ये-जा करत असतात. त्यामुळे या देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका होता. परंतु, ‘फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा,’ असे आवाहन करत सरकारने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला होता.
रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर सार्वजनिक वावरावर टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध आले. ट्रेन, बस सुरू असल्या तरी त्यात क्षमतेच्या निम्माचे प्रवासी प्रवास करू शकतात. मॉलमध्ये प्रत्येकाच्या शरीराचे तपमान मोजून ओळखपत्रही स्कॅन केले जाते. त्यामुळे कुठे ‘कोविड-१९’ रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कात आलेल्या संभाव्य लोकांचा शोध घेणे सरकारला सुकर होत होते. ९० टक्के कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करावे, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, असे निर्बंध घालण्यात आले. सुरुवातीला सरकारनेच मास्क आणि सॅनिटायझरचे विनामूल्य वाटप केले होते. सरकारी निर्बंध आणि लोकांनी घडविलेले स्वयंशिस्तीचे प्रदर्शन यामुळेच कोरोना नियंत्रणात आहे. रुग्णसंख्या १७ हजारांवर गेली असली तरी १६ जणांनीच जीव गमावला, ही बाब येथील आरोग्य व्यवस्था क्षमता सिद्ध करणारी आहे. देशात कुठेही भीतीचे वातावरण नाही. परंतु, सरकारसह सर्वसामान्य नागरिकांना येत्या काळात येऊ घातलेल्या आर्थिक संकटाची धास्ती असल्याची चिंता अस्मिता व्यक्त करतात.
मजुरांच्या वस्त्या बेजार
सिंगापूरमध्ये काम करणारे दक्षिण आशियाई देशांतील अनेक मजूर लेबर कॅम्पमध्ये वास्तव्याला आहेत. तेथे संक्रमण सुरू झाल्यानंतर सिंगापूरची रुग्णसंख्या वाढली. आजच्या घडीला ८० टक्के रुग्ण हेच मजूर असून त्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्या उपचारांसाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून ४ मे रोजी संपणारे लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे.
... तर पुन्हा सिंगापूरमध्ये प्रवेश नाही
सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास स्थानिक नागरिकांना एक हजार डॉलर आणि कारावास अशा शिक्षेची तरतूद केली आहे तर, अन्य लोकांकडून नियमभंग झाल्यास त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा सिंगापूर प्रवेश मिळणार नाही, असा शिक्का मारला जातो. अनेक परदेशी विद्यार्थ्यांवर तशी कारवाई झाली आहे. त्याशिवाय परदेशी प्रवासाची माहिती लपवली, क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केले तरी अशाच स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचे अस्मिता यांनी आवर्जून सांगितले