अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच मुंबईतील अनेक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे काही रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स यांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगितले आहे.
मुंबईतील वोखार्ड हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. सुश्रुषा हॉस्पिटल बंद करण्यात आले होते पण ते आता सुरू झाले आहे. सैफी हॉस्पिटल देखील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी सुरू झाले आहे. तर जसलोक आणि भटिया चा काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. ब्रीच कॅण्डी चा देखील काही भाग बंद ठेवा अशा सूचना होत्या मात्र व्यवस्थापनाने संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवले आहे. या ठिकाणी त्यांनी सॅनिटायजेशन आणि अन्य गोष्टी पूर्ण करून आठ ते दहा दिवसात ही रुग्णालये पुन्हा सुरू केली जातील, अशी माहिती मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
शुश्रूषामध्ये क्वारंटाइन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल
दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तेथील अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले. यात ६५ विविध शाखेतील डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांचा समावेश आहे. मात्र क्वारंटाइन दरम्यान मुलभूत सुविधा नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. पिण्याचे पाणी, जेवण, स्वच्छता अशा सेवांचा अभाव असल्याचे सांगत आम्ही इतरांच्या आरोग्यासाठी झटतो आमचा विचार कधी करणार अशी व्यथा या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.
पालिकेच्या आदेशानंतर ‘ती’ रुग्णालये होणार पुन्हा कार्यान्वित
शहर उपनगरातील हिंदुजा, ब्रीचकॅण्डी, दादरचे शुश्रूषा रुग्णालय, जगजीवन रामनारायण रेल्वे रुग्णालय, पार्थ नर्सिग होम्स, चेंबूरमधील साई, मुलुंडचे स्पंदन, जोगेश्वरी येथील मिल्लत नगर अशी जवळपास १५ रुग्णालयांमधील सेवा बंद झाल्याने या रुग्णालयांना निजर्तुंकीकरण करण्याची नियमावली दिली असून या आठवडय़ात रुग्णालयातील काही नमुने तपासणीसाठी पाठवून कोरोना विषाणू संसर्ग नष्ट झाल्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुन्हा ही रुग्णालये लवकरच पुन्हा खुली केली जाणार आहेत असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.