Coronavirus: ‘लेकरा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे; अवघ्या राज्याची जबाबदारी छान निभावतोय’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 07:33 PM2020-04-09T19:33:10+5:302020-04-09T19:34:21+5:30
तुम्ही उभ्या आयुष्यात हा संघर्ष पाहिला आहे. तुमच्या आशीर्वादाने मी पुढे चाललोय, मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंसोबत संवाद साधला
मुंबई – संपूर्ण देशात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. जगातील २०० हून अधिक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. १५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८९ हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ११०० च्या वर पोहचली आहे तर ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाशी युद्ध लढताना संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियातही अनेकदा उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्याबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. एवढ्या संघर्षाच्या काळातही कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे राज्याची जबाबदारी योग्यरित्या पार पडत असल्याचं कौतुक शरद पवारांनीही केलं आहे.
अशा परिस्थितीत अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देताना म्हणाल्या की, इतकं आव्हान, संकट तुझ्यावर आहे, दडपण असतानाही तु सगळं हे निभावतोय, बाळा, तुझ्या खांद्यावर अवघ्या देशाची जबाबदारी आहे, अभिमान वाटतो तुझा अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर हा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी स्वत: सिंधुताईंना फोन करुन आशीर्वाद घेतला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले की, तुम्ही उभ्या आयुष्यात हा संघर्ष पाहिला आहे. तुमच्या आशीर्वादाने मी पुढे चाललोय. मुख्यमंत्रिपद हे वेगळं नाही. मी आहे तसाच आहे. राज्याची जबाबदारी मी सांभाळतोय. तुम्हीही तुमची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका असं त्यांनी सिंधुताईंना सांगितले.
यापूर्वी प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केले होते. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. हा आकडा चिंता वाढवणारा असला तरी राज्य सरकार अगदी खंबीरपणे आणि अतिशय संयमाने स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक पातळ्यांवर लढत आहेत. ते ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत, ते पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.