Coronavirus: लेखी आदेश आले तरच चित्रपट गृह बंद ठेवू; मालकांचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 02:01 PM2020-03-14T14:01:23+5:302020-03-14T14:23:44+5:30
मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधील चित्रपटगृहे, व्यायामशाळा, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र, याला सर्रास ठिकाणी हरताळ फासण्यात आला आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधील चित्रपटगृहे, व्यायामशाळा, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र, याला सर्रास ठिकाणी हरताळ फासण्यात आला आहे. दादरचे प्लाझा सिनेमागृह सुरू ठेवण्यात आले होते. तर जूहूचे पीव्हीआर चित्रपटगृहही सुरू होते. यावर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आहे.
ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली होती. जुहू येथील पीव्हीआर सुरु असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर यांना मिळाली. यावर त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला असून सदर चित्रपट गृह जर मालकाने बंद केले नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावर पीव्हीआर चित्रपटगृहाचा मालकाने त्यांची बाजू मांडताना पोलिसांनी किंवा शासनाने चित्रपट गृह बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिलेले नाहीत. मग आम्ही कसे बंद ठेवणार असा सवाल केल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली.
तर ठाण्यामध्ये विविआना मॉलमधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्यात आला आहे.