मुंबई – दक्षिण मुंबईत एका हार्ट सर्जनला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मागील आठवड्यात या डॉक्टरने ५ रुग्णांचे ऑपरेशन केले होतं तसेच ४० पेशंटच्या संपर्कात आले होते. यातील १४ जण हाई-रिस्क कॅटेगिरीमधील आहे. सध्या या डॉक्टरला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्जनचे ८५ वर्षीय वडील कोरोना संक्रमित होते. गुरुवारी ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळपर्यंत डॉक्टर ड्यूटीवर होते. त्यांचा मुलगा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लंडनहून परतला आहे. त्यालाही कोरोनाची लागण आहे. संक्रमित डॉक्टरने ज्या रुग्णांची सर्जरी केली होती त्यांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. माहितीनुसार महापालिकेने डॉक्टरच्या संपर्कात असलेल्या ४० रुग्णांचा शोध घेतला आहे. प्रशासनाने ऑपरेशन थिएटर आणि सर्जिकल आयसीयू बंद केलेत. ज्या रुग्णांची सर्जरी झाली त्यातील दोघांची चाचणी झाली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
यातील भायखळा येथील रहिवाशी ७३ वर्षीय उद्योगपती आहेत. २० मार्चला बायपास सर्जरीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. सोमवारी त्यांच्यावर सर्जरी झाली. रुग्णाच्या मुलाने सांगितले की, सर्जरी यशस्वी झाल्याने आम्ही आनंदात होतो. डॉक्टरने माझ्या वडिलांना गुरुवारपर्यंत तपासलं होतं. गुरुवारी आम्हाला सांगितले त्यांना सीटीस्कॅनसाठी घेऊन गेलेत. त्यांना कोरोनाची लागण आहे तसेच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
एक डॉक्टर इतका हलगर्जीपणा कसं करु शकतो? त्यांना त्यांच्या कुटुंबातील प्रवास करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहितीही आहे असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. त्या सर्जनने नवी मुंबईतील ७८ वर्षीय महिलेचं ऑपरेशन केले होते. माझ्या आईला सोमवारी रुग्णालयात दाखल केले, बुधवारी तिच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली. तिचं ऑपरेशन यशस्वी झालं पण आता ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्यांना कोरोनाची लागण असल्याचं समजताच आम्हाला भीती वाटू लागली आहे. पोलिसांनी आणि बीएमसीने हॉस्पिटल परिसर सील केला आहे असं त्या महिला रुग्णाच्या मुलाने सांगितले. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.