CoronaVirus: तमाशाची अर्थव्यवस्था कोलमडली; हजारो कलावंतांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:42 AM2020-04-25T01:42:57+5:302020-04-25T01:44:16+5:30
राज्यभर सुमारे २०० तमाशा फड
मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनचा चांगला परिणाम म्हणून ठिकठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविले जात आहे. मात्र, लॉकडाउनचा जसा चांगला परिणाम होत आहे; तसा तो विपरीतही होत आहे. उद्योगधंद्यांसह प्रत्येक गोष्टीला कोरोनाचा फटका बसला असून, आता तो लोककला असलेल्या तमाशालाही बसला आहे.
महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी एकरूप झालेला मनोरंजनाचा लोककला आविष्कार म्हणजे तमाशा होय. मात्र, त्यामुळे शहरी भागात चित्रपट-नाट्य कलावंत, तर ग्रामीण भागात लोककलावंत बेरोजगार झाले. महाराष्ट्राची लोककला राज्याचे सांस्कृतिक वैभव मानली जाते. काळाच्या ओघात अगोदरच एकेक लोककला लोप पावत चालली असताना कोरोना महामारीने आता या लोककला व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या छोट्या मजुरांपासून तर मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांचीच अर्थव्यवस्था कोलमडली. मजूर, नोकरदार, शेतकरी, पुजारी, कलावंत, व्यावसायिक ते राजकीय पुढारी सर्वांनाच घरात बसावे लागले. आता याचा फटका लोककला असलेल्या तमाशाला बसत आहे. या तमाशा कलावंतांसाठी चैत्र, वैशाख हे सुगीचे महिने असतात.
लोकरंजनाबरोबर लोकशिक्षण घडवण्याचे काम तमाशाने केले. लोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी ही लोककला प्रबोधनाचे साधन आहे. वर्षभर खेडोपाडी तयारी करून हे कलावंत चैत्र, वैशाख महिन्यांकडे डोळे लावून बसतात. मात्र, यंदा गुढीपाडव्यानंतर त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.
‘...अन्यथा तमाशा केवळ पुस्तकातच राहील’
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तमाशापंढरी नारायणगाव येथे राहुटी ठोकून हजारो तमाशा कलावंत व फडमालक हजर होतात. फडमालक कॉन्टॅÑक्टरकडून पैसे घेऊन फड उभा करतात आणि दीड-दोन महिन्यांत कमाई करून पैसे परत करतात. मात्र, यावर्षी कोरोनाने त्यांच्या ताटातील घासच हिरावून घेतला आहे. शासन व तमाशा रसिकांनी पाठबळ दिले नाही तर आता तमाशा संपून जाईल, अशी भीती मराठी ढोलकी फडमालक संघटना अध्यक्ष व सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.