Coronavirus: ...अन् मदतीला एसटी आली धावून; कोरोना काळात जनतेसाठी पुढे सरसावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 01:33 AM2021-03-23T01:33:29+5:302021-03-23T01:33:53+5:30
मुंबई महानगरपालिकेला कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १२ एसटी बसेसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करून दिले. या रुग्णवाहिका महापालिकेच्या सेवेत आहेत.
नितीन जगताप
मुंबई : कोरोना संकट काळात महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीने विविध ठिकाणी प्रवासी दळणवळणाची सेवा देऊन सरकारच्या आरोग्य, पोलीस, महसूल, परिवहन या विभागांच्या खांद्याला खांदा लावून दमदार कामगिरी केली. लाॅकडाऊनमध्ये रेल्वे वाहतूक बंद असताना मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी एसटी धावून आली.
काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा काही काळापुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी सरकारने एसटी महामंडळावर टाकली. एसटीनेही ती यशस्वीपणे पार पाडली.
महाराष्ट्रातील एसटी बसेस स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या. ९ मेपासून ३१ मेपर्यंत ४४ हजार १०६ बसेसद्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेला कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १२ एसटी बसेसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करून दिले. या रुग्णवाहिका महापालिकेच्या सेवेत आहेत.
रेल्वेने दिली ‘अत्यावश्यक’ सेवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक फेब्रुवारपर्यंत बंद होती. परंतु विशेष लोकल आणि मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात आल्या. अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लाेकल धावत हाेत्या. फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लाेकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
- प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन मध्य, पश्चिम रेल्वेच्या ९५ टक्के फेऱ्या सुरू
- पार्सल ट्रेनमधून अत्यावश्यक साखळीला मदत
- कोरोनाशी लढा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून रोबोट आणि रोबोटिक उपकरणे, प्रवासी तपासणी, सुरक्षित तिकीट वितरण आणि तपासणीला प्राधान्य
- प्रवासी व सामानाशी शून्य संपर्क
- पश्चिम रेल्वेचे इपेट्रोलिंग आणि मॅनेजमेंट ॲप, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढाकार