मुंबई : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण एसटी महामंडळ करत आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना कुर्ला नेहरू नगर येथील कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहा जणांची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी जाण्यास सांगून दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले. त्यामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.
एसटी महामंडळातील कुर्ला नेहरू नगर मधील यांत्रिक कर्मचाऱ्यांला 1 मे रोजी कोरोनाची लागण झाली. यावेळी हा कर्मचारी घाटकोपर येथील रुग्नालयात दाखल झाला. मात्र या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी पाठविले. त्यामुळे या सहा जणांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना कोरोना होण्याची भीती आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघंटनांनी आक्षेप घेत, या सहा जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र संबंधित आगार व्यवस्थापक आणि एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनेनी दिली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस धावत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना योग्य मास्क, हातमोजे, सॅनेटायझर दिले गेले नाही. रेस्ट रूम स्वच्छ केली जात नाही. बस आणि आगार परिसर निर्जंतुकीकरण केले जात नाही, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनेनी दिली. --
कोरोना लागण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भावाचे लग्न होते. मात्र आता हे लग्न पुढे ढकलले आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या कुटूंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लागण झालेल्या कर्मचाऱ्यांसह इतर सहा कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांची आरोग्याची तपासणी केली पाहिजे. एसटी महामंडळ आणि संबंधित अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. संबंधीत प्रकरणात चौकशी करून कारवाई करावी. कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची योग्य सोय केली नाही. उरण, पनवेल येथील कर्मचाऱ्यांना मास्क दिले नाही. एसटी महामंडळाने तत्काळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. गाड्या व परिसर निर्जंतूकीकरण करून मिळावेत, ५० लाखाचे विमा कवच मिळावे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस एसटी कामगार काँग्रेस (इंटक)
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन एसटीच्या अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांकडून फक्त कामे करून घेत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी महामंडळ घेत नाही. रेस्ट रूम, बस निर्जंतूकीकरण केल्या पाहिजेत. कर्मचाऱ्याना कामाची जबाबदारी देताना त्यांना आराम पण मिळेल, याची खबरदारी घेतली पाहिजे.वाहकांना, चालकांना मास्क, हातमोजे दिले पाहिजेत.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना