CoronaVirus: एसटी महामंडळाचा फक्त एक दिवसाचा दिखावा; कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:48 PM2020-03-27T21:48:13+5:302020-03-27T21:52:42+5:30
आता बसही धुवत नाही आणि कर्मचाऱ्यांना मास्कही देत नाही
- कुलदीप घायवट
मुंबई: एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस स्थानके धुणे, एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरची बाटली देणे, अशा खबरदारीच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाने या सूचनांचे पालन एक दिवसासाठी केले. आता बसही धुतली जात नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांना मास्कही देत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दररोज मास्क पुरवण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. त्यानुसार चालक, वाहक, कंट्रोल कॅबिनमधील वाहतूक नियंत्रक व बसस्थानकातील वाहतूक पर्यवेक्षक यांना संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने एकच दिवस डिस्पोजल मास्क पुरवण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मास्क महामंडळाकडून देण्यात आले नाही, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
एसटी बसची, बसस्थानकांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्याबाबत परब यांनी निर्देश दिले होते. मात्र आगारात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने बस स्थानकाची स्वच्छता आणि एसटी बसची स्वच्छता होत नसल्याचे दिसून आले.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका, शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार, पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटीच्या बस उपलब्ध केल्या जात आहेत. मात्र हे प्रवासी ज्या बसमधून प्रवास करतात, त्या बसवर कोणत्याही प्रकारची निर्जंतुकीकरण फवारणी केली जात नाही. हात धुण्यासाठी प्रवाशांना सॅनिटायझर उपलब्ध नाही, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. परिणामी, संचारबंदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.