Join us

१ नोव्हेंबरपर्यंत सर्व लोकल, कार्यालयं सुरू करा; शाळा जानेवारीत उघडा: TIFR चा महत्त्वाचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 9:40 AM

१ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालये, वाहतूक व्यवस्था टप्प्याटप्प्याने पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये शहरातील अनलॉक ३० टक्क्यांपर्यंत वाढवलं पाहिजे.१ नोव्हेंबरपर्यंत हळूहळू शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करावेतदेशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबईतसेच अन्य शहरे लवकरच सुरु करण्याची मागणी

मुंबई – कोरोना संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशात आणि राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रिया सुरु आहे. शाळा-कॉलेज बंद आहेत, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. सर्वात मोठी परिवहन व्यवस्था रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हळूहळू राज्य अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत आहे. परंतु कोरोना पूर्वीची परिस्थिती कधी होणार? हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला आहे.

या प्रश्नाचं उत्तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने गणितीय दृष्टीकोनातून शोधून काढत त्याचा अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, १ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालये, वाहतूक व्यवस्था टप्प्याटप्प्याने पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल. तसेच स्कूल ऑफ टेक्नोलॉजी आणि कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांच्या समितीने जानेवारी २०२१ पासून शाळा पुन्हा सुरु करण्याची शिफारस केली आहे.

हर्ड इम्युनिटीनुसार, ७५ टक्के झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये आणि ५० टक्के इतर वस्तीत राहणाऱ्या लोकांमध्ये डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत अँन्टीबॉडीज निर्माण होतील असं म्हटलं आहे. या अहवालात मागील १५ दिवसांपूर्वी दिलेल्या कोरोनावरील जागतिक इशाऱ्यांचा उल्लेख केला नाही. टीआयएफआरच्या टीमने म्हटलं आहे की, सप्टेंबरमध्ये शहरातील अनलॉक ३० टक्क्यांपर्यंत वाढवलं पाहिजे. यात कार्यालयातील उपस्थिती आणि वाहतूक व्यवस्थेचा समावेश आहे. ऑक्टोबरपर्यंत ५० टक्के गोष्टी शहरात सुरळीत झाल्या पाहिजेत. १ नोव्हेंबरपर्यंत हळूहळू शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करावेत असं त्यांनी सांगितले आहे.

मात्र हे सुरु करताना सार्वजनिक वाहतुकीमध्ये सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे आणि कार्यालये, रेल्वे येथे नियमित निर्जंतुकीकरण यासारख्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले पाहिजे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबईतसेच अन्य शहरे लवकरच सुरु करण्याची मागणी होत आहे. TIFR टीमने सर्व परिस्थितींचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केला आहे. सप्टेंबरमध्यापर्यंत मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली तर आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम पाहायला मिळतील असं म्हटलं आहे.

डॉ. जुनेजा म्हणाले की, नोव्हेंबरच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढेल. टीआयएफआरच्या टीमने महापालिकेसोबत संयुक्तरित्या मुंबईतील तीन प्रभागात सेरो सर्व्हेक्षण केले. पहिल्या सर्व्हेत जुलै महिन्यात झोपडपट्टीत ५७ टक्के आणि इतर वस्तीतील १६ टक्के भागात अँन्टीबॉडीज विकसित झाल्या नाहीत. दुसरा सर्व्हे या महिन्याच्या अखेरपर्यंत होईल. अपेक्षेप्रमाणे डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंत हे प्रमाण झोपडपट्ट्यांमध्ये ७५ टक्के आणि इतर वस्तीत ५० टक्क्याच्या जवळपास असेल. या अंदाजानुसार शहरात नवीन संक्रमण होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल असं म्हटलं आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकामुंबई लोकलशाळा