CoronaVirus : "खासगी दवाखाने, नर्सिंग होम सुरु करा, अन्यथा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:27 PM2020-04-25T18:27:20+5:302020-04-25T18:28:08+5:30

CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वीच महापालिकेद्वारे देण्यात आले आहेत.

CoronaVirus: "Start private clinics, nursing homes, otherwise ..." | CoronaVirus : "खासगी दवाखाने, नर्सिंग होम सुरु करा, अन्यथा..."

CoronaVirus : "खासगी दवाखाने, नर्सिंग होम सुरु करा, अन्यथा..."

Next

मुंबई : कोरोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी मुंबईतील खासगी दवाखाने, नर्सिंग होमची सुविधा सुरू ठेवा असे निर्देश देऊनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता नर्सिंग होम तत्काळ सुरू केले नाही तर थेट परवाना रद्द करणार असल्याचा इशारा पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. शिवाय खासगी दवाखाने देखील सुरू करावेत अन्यथा ‘साथरोग कायदा १८९७ ’नुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वीच महापालिकेद्वारे देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अद्याप या सेवा सुरू न झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांना पालिका आयुक्तांनी सक्त निर्देश देऊन सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी अशा सूचना पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला दिल्या आहेत.

अडथळा आणणार्‍यांवरही कारवाई होणार
नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत असून संबंधित सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी यांच्याकडून सेवा सुरू करण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेल्यास किंवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही ‘साथरोग कायदा १८९७  ’नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी २४ विभागामधील संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी अधिकार्‍यांनी सर्वेक्षण सुरू करून आदेश पाळत नसणार्‍यांवर कारवाई सुरू करावे असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मार्गदर्शन सूचनांचे पालन महत्त्वाचे !
पालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी दवाखान्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात येत आहेत. यानुसार सेवा सुरू करताना दवाखान्यात येणार्‍या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे ‘वीना स्पर्श’ तपासावे, तापमान ९८.६ फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.

एखाद्या व्यक्तीची लक्षणे ‘कोरोना ‘सारखी असल्यास अशा व्यक्तींना पालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे, खासगी दवाखान्यांमध्ये ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करण्यात यावेत असे निर्देशही देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे विकार असणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. तसेच एखाही व्यक्ती हे त्यांना सांगण्यात आलेले औषधोपचार योग्यप्रकारे घेत असल्याची खातरजमा करावी. याशिवाय आजारी व्यक्तीला मास्क वापरण्याच्या, सुरक्षित अंतर राखण्याच्या सुचना द्याव्यात असे निर्देशही देण्यात आले आहेत.
 

Web Title: CoronaVirus: "Start private clinics, nursing homes, otherwise ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.