अखेर ठाकरे सरकारकडून विमान वाहतुकीला परवानगी; उद्यापासून मुंबईत लँडिंग, टेक ऑफ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:28 PM2020-05-24T19:28:32+5:302020-05-24T19:41:10+5:30
उद्यापासून मुंबईत प्रत्येकी २५ विमानांचं लँडिंग आणि टेक-ऑफ
मुंबई: राज्य सरकारनं देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली आहे. ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणून संसर्ग/प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा, असा सवाल उपस्थित करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विमान वाहतुकीविरोधात सूर आळवला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर सरकारच्या भूमिकेत बदल झाला. उद्यापासून मुंबईत प्रत्येकी २५ विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यानंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
Maharashtra govt has agreed to allow 25 take offs and 25 landings everyday for domestic flights from Mumbai. This number will be increased gradually. State govt will issue details and guidelines in this regard soon: Maharashtra Minister Nawab Malik. (File pic) pic.twitter.com/VnctP8YpK5
— ANI (@ANI) May 24, 2020
उद्यापासून मुंबईत देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या २५ विमानांचं लँडिंग आणि २५ विमानांचं टेक-ऑफ होईल. हळूहळू हा आकडा वाढवण्यात येईल. राज्य सरकार याबद्दलची नियमावली लवकरच प्रसिद्ध करेल, अशी माहिती नवाब मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिली. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना विमान वाहतूक सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून वेळ मागितला असल्याचं म्हटलं होतं.
देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासोबत संवाद साधला आहे. मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र यानंकर अवघ्या काही तासांमध्ये ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबईतून विमान वाहतूक सुरू असणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये योग्य ताळमेळ आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.