मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकेची फैर झाडली आहे. राणे म्हणाले की, 'महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाच्या उत्पन्नापैकी 33 टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून जाते. येथे आरोग्य यंत्रणा चांगली आहे. तरीही येथील राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होताना दिसत नाहीत. रुग्णांची योग्य काळजी घेतली न गेल्याने मृतांची संख्या वाढली आहे.'
'कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या भागात योग्य ते उपाय केले नाहीत,' असा टोला राणेंनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार चांगले काम करत आहे, असे सांगितले असता नारायण राणे म्हणाले की, या सरकारचे कौतुक सरकारमधील माणसेच करत आहेत. आणि या सरकारचं कौतुक का करायचं, कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले म्हणून का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. राज्यातील सरकारची अवस्था एक ना धड भराभर चिंध्या अशी झाली आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात सरकारला अपयश येत आहे. राज्यातील परिस्थिती पाहून येथे लष्कर पाठवावे असे आवाहन मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना करणार आहे, असेही राणेंनी सांगितले.