Coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्यूंचा खरा आकडा लपवला?; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 08:15 PM2020-06-15T20:15:49+5:302020-06-15T20:18:34+5:30

इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम डेथ ऑडिट कमिटीने कुणाच्या दबावात केले?

Coronavirus: State Government hides true death toll in Mumbai?; Devendra Fadnavis allegation | Coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्यूंचा खरा आकडा लपवला?; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Coronavirus: मुंबईतील कोरोना मृत्यूंचा खरा आकडा लपवला?; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Next
ठळक मुद्देमुंबईच्या दृष्टीने हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायकडेथ ऑफ ऑडिटने ४५१ मृत्यूंची नोंद नॉन कोविड म्हणून केलीआयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत ही बाब उघडकीस

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांच्या वर पोहचली असून यातील ५० हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर घरी पाठवले आहेत. राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ३ हजारांच्या वर आहे. मात्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, एका अतिशय गंभीर आणि तितक्याच महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष वेधायचं आहे. मुंबईच्या दृष्टीने हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल महापालिकेने गठीत केलेल्या डेथ ऑडिट कमिटीकडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. पण डेथ ऑफ ऑडिटने ती नॉन कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत ही बाब उघडकीस आली आहे असं ते म्हणाले.

इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम डेथ ऑडिट कमिटीने कुणाच्या दबावात केले? या कमिटीवर राज्य सरकारच्या वतीने कारवाई केली जाणार आहे का? असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत. आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाला पाठविले असून त्यात कोरोना संदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे ती तातडीने पाठवा असं म्हटलं आहे. झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्याचसोबत तपासणी करुन ३५६ अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरण असे एकूण ४५१ मृत्यू कोविडमुळे झाले आहेत. ते तात्काळ नोंदवले पाहिजे. कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना कोरोनामुळे मृत्यू नाहीत हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? मनात येईल त्याप्रमाणे कोरोना मृत्यू कोरोना नसल्याचं ठरवण्यात येत आहे. ही बाब अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरुपाच्या कटात मोडणारी आहे असा गंभीर आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केला.

दरम्यान, सुमारे ५०० प्रकरणे जी विविध रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं म्हटलं आहे. पण ती प्रकरणे डेथ ऑडिट कमिटीकडे सादरच करण्यात आली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असं न करणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित करत दोन्ही प्रकरणे पाहता ९५० हून अधिक मृत्यू कोरोनामुळे झालेत पण त्याची नोंद झालेली नाही. मुंबईतील कोरोनाची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते, याबाबत जनतेला माहिती देऊन गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.  

Web Title: Coronavirus: State Government hides true death toll in Mumbai?; Devendra Fadnavis allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.