coronavirus: राज्य सरकार अजून ११ हजार कैद्यांना एमर्जंसी पॅरोलवर मुक्त करणार - अनिल देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 09:16 PM2020-06-07T21:16:23+5:302020-06-07T21:17:03+5:30
एकीकडे शहरांपासून गावांपर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच तुरुंगात असलेल्या हजारो कैद्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहेत.
मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्य सरकारसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे शहरांपासून गावांपर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच तुरुंगात असलेल्या हजारो कैद्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहांमध्ये बंद असलेल्या सुमारे ११ हजार कैद्यांची एमर्जंसी पॅरोलवर मुक्तता करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, राज्यातील ६० कारागृहांमध्ये सुमारे ३८ हजार कैदी बंद होते. दरम्यान, तुरुंगात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे यासाठी यापूर्वी ९ हजार ६७१ कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. आता आम्ही अजून ११ हजार कैद्यांना एमर्जंसी पॅरोलवर मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ३१ तात्पुरते तुरुंग उभारले आहेत.
दरम्यान, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘’आतापर्यंत राज्यातील सुमारे ३ हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ३० हून अधिक जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ५० ते ५५ या वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना सामान्य ड्युटी तर ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना पेड लीव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे,’’असे अनिल देशमुख यांनी सांगितले.