Coronavirus: महसुलासाठी वाईन शॉप सुरू करण्याची राज ठाकरेंची सूचना योग्य आहे?; महसूलमंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:49 PM2020-04-24T15:49:55+5:302020-04-24T16:03:02+5:30
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा, अशी मागणी केली होती.
मुंबई: राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे, अशी सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या वाईन शॉप सुरु करण्याची मागणी किती योग्य वाटते हे विचारल्यावर ते माहिती नाही, पण आर्थिक गरज आहे हे खरं आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तत्पूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा, अशी मागणी केली होती. तसेच 'वाईन शॉप्स' सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा असं राज ठाकरेंनी सांगितले. त्याचप्रमाणे हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल, असं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
गेल्या ३५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील उपहारगृहं आणि रेस्टोरंटस पूर्णपणे ठप्प आहेत. ह्याचा फटका जसा हॉटेल व्यावसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरांमध्ये 'हॉटेल' ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर ती गरज बनली आहे, असं मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेत, अश्या सूचना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या आहेत.
भाजीपाला, फळफळावळ, दूध, बेकरी आणि किराणा अशा गोष्टीदेखील एक-एक करून सुरू कराव्यात. काही ठिकाणी आहेत परंतु त्यात सुसूत्रता नाही. अशाच गोष्टी हळूहळू सुरू करत राज्याचं अर्थचक्र सुरू करून द्यायला पाहिजे. ह्या रोगाचा सामना करण्यासाठी लोक सहकार्य करतीलच परंतु आपल्यालाही त्यांचं जगणं सुसह्य व्हावं ह्याचा विचार करायला हवा आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशातील इतर राज्यांनी देखील ह्याचा विचार करावा. केंद्र सरकारकडून मदत येईल तेंव्हा येईल, ती किती येईल हे माहित नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे ह्यासारखे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नसल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे.