coronavirus: मुंबईत आरोग्य यंत्रणेवर ताण, मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:20+5:302021-04-01T04:23:04+5:30

coronavirus in Mumbai : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे.  मुंबईत रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ५६१ खाटांपैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत.

coronavirus: Stress on health system in Mumbai, 12,000 out of 16,000 beds filled in Mumbai | coronavirus: मुंबईत आरोग्य यंत्रणेवर ताण, मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या

coronavirus: मुंबईत आरोग्य यंत्रणेवर ताण, मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या

Next

 मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे.  मुंबईत रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ५६१ खाटांपैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत. तर केवळ ३ हजार ९३३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
मुंबईत रुग्णालय व कोविड केंद्रांतील अतिदक्षता विभागात १ हजार ६२७ अतिदक्षता खाटा उपलब्ध असून, १ हजार ३०३ खाटा आरक्षित आहेत. ३२४ खाटा उपलब्ध आहेत. ऑक्सिजन खाटा ८ हजार ९१४ असून, त्यातील ६ हजार ६९५ खाटा आरक्षित आहेत. २ हजार २१९ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध असलेल्या एकूण हजार खाटा असून त्यातील ८३० खाटा आरक्षित आहेत. तर १७० खाटा रिक्त आहेत.  

 नियंत्रण कक्षातून  खाटांचे नियोजन
 केवळ लक्षण असलेल्या रुग्णांनाच तेही पालिका नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून खाट उपलब्ध करून दिली जाईल, असे आदेश जारी केले आहेत. कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याने रुग्णालयीन खाटा वाढविण्याबरोबर अनेक निर्णय घेत आहोत. 
 आगामी काळातील गरज तसेच लक्षण नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयीन खाटा अडवू नयेत व गरजू रुग्णांनाच त्या प्राधान्याने मिळाव्या यासाठी परस्पर रुग्णांना खाटा देऊ नये, तसेच पालिका नियंत्रण कक्षच्या माध्यमातूनच खाटांचे नियोजन करण्याचे आदेश जारी केले आहेत.  

...तर प्रयोगशाळांचा परवाना रद्द
ज्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे गरजेचे आहे, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच पालिकेने २४ विभागांत स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात योग्य माहितीअभावी गोंधळाचे वातावरण निर्माण होते. परिणामी यापुढे एकाही प्रयोगशाळेने पालिकेला न कळवता परस्पर रुग्णाला कोरोना अहवाल दिल्यास संबंधित प्रयोगशाळेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. 

नर्सिंग होम्सही होणार कोविडसाठी सज्ज
मुंबई :  शहरातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येत्या आठवडाअखेरीपर्यंत सात हजार खाटांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहर-उपनगरातील ६९ नर्सिंग होम पालिकेने ताब्यात घेतले असून या माध्यमातून खाटांची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे. खाटांच्या उपलब्धतेत गैरसोय टाळून पारदर्शकता टिकविण्यासाठी रुग्णांना थेट रुग्णालयात खाटा मिळणार नसून त्याकरिता २४ विभागांतील वॉररूममध्ये संपर्क साधावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णांना थेट दाखल करून घेतल्यास खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्यूही वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे, तसेच गृहविलगीकरणात नियमांचे पालन न करणे ही  प्रमुख कारणे असू शकतात असे, कृती दलातील डॉक्टर्सनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे शोध, चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रींवर भर देण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लवकरच २२ हजार खाटा
 बहुतेक रुग्णांचा विशिष्ट खासगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आग्रह असतो. तथापि पालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षमधील डॉक्टर रुग्ण वा नातेवाइकांशी बोलून रुग्णालयात दाखल करण्याबाबत नियोजन करतील. 
 गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार एकीकडे लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी संस्थात्मक खाटा वाढवणे, तसेच रुग्णालयातील खाटा वाढविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 
  येत्या काही दिवसांत २२ हजार रुग्णालयीन खाटा तसेच खासगी रुग्णालयातील सात हजार खाटा उपलब्ध झालेल्या असतील असा विश्वास नुकताच पालिका आय़ुक्तांनी व्यक्त केला आहे.

Web Title: coronavirus: Stress on health system in Mumbai, 12,000 out of 16,000 beds filled in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.