coronavirus: तसा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार, राज्य सरकारचा पतंजलीला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:59 PM2020-07-03T15:59:10+5:302020-07-03T16:21:50+5:30
आता कोरोनिलवरून राज्य सरकारकडून पतंजलीला इशारा देण्यात आला आहे.
मुंबई - योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आणलेले कोरोनिल हे औषध रोज नव्या वादात अडकत आहे. सुरुवातीला या औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीने नंतर आपला दावा मागे घेत हे औषध केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधाच्या विक्रीस परवानगी मिळाली होती. मात्र आता कोरोनिलवरून राज्य सरकारकडून पतंजलीला इशारा देण्यात आला आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधामुळे कोरोना बरा होत नाही. मात्र या औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा या कंपनीने केल्यास तसेच याबाबत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल केल्यास पतंजलीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
पतंजलीने औषधाला दिलेले कोरोनिल हे नाव आणि प्रसारमाध्यमातून त्याचा सुरू असलेला प्रचार यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. या कोरोनिलचा वापर केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. त्याने कोरोना बरा होत नाही, असेही शिंगणे यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने या औषधाला केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनावरील औषध म्हणून मान्यता दिलेली नाही, असेही शिंगे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या