मुंबई : रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अद्याप पूर्ण यश आलेले नाही. संभाव्य तिसरी लाट व त्याचे लहान मुलांवरील परिणामांबाबत सध्या अंदाजच आहेत. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डाॅक्टर’ या संवादाच्या कार्यक्रमात दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा म्हणजे राज्यात १ जूननंतरही कडक निर्बंध राहतील, याचे संकेत असल्याचे मानले जात आहे. ‘माझा डाॅक्टर’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी कोविडविषयक बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यतील ६ हजार ३०० बालरोगतज्ज्ञांना उपचारांबाबत ऑनलाइन मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञांसह इतर संस्था, संघटनेतील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स व नागरिकांनी विविध माध्यमांतून हा ऑनलाइन कार्यक्रम पाहिला. सर्व डाॅक्टर, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे विविध पक्षांचे लोक आणि नागरिकांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत असल्याचे सांगतानाच मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बालरोगतज्ज्ञांचेही टास्क फोर्स- राज्य शासनाच्या बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्षपद डॉ. सुहास प्रभू यांच्याकडे असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. - त्यांनी लहान मुलांमधील कोविड संसर्ग आणि वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली. - मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनीही सूचना केल्या.
आढाव्यानंतरच निर्बंधांबाबत निर्णय घेणार जालना : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सिंगल डिजिटमध्ये येणे, आयसीयू, ऑक्सिजनची बेड उपलब्धता ६० टक्क्यांपेक्षा जास्त राहणे, मृत्यू कमी होणे, या सर्व बाबींचा अभ्यास करून नंतरच राज्यातील कडक निर्बंध वाढवायचे की शिथील करायचे याचा निर्णय होईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यावर याची अंमलबजावणी होईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात १३ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचे चांगले परिणामही समोर येत आहेत. असे असले तरी लगेचच १ जूनपासून राज्यातील सर्व निर्बंध हटविले जातील, हा समज चुकीचा आहे.
तयारीचा आढावा घेऊन सर्व बाबी सकारात्मक असतील, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून नंतरच निर्बंध काही अंशी शिथिलतेबाबत निर्णय होऊ शकेल. पूर्णपणे निर्बंध हटविले जातील, या भ्रमात राहू नये. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री