कुलदीप घायवट
मुंबई - एसटी महामंडळाची सेवा प्रवाशांसाठी दर्जेदार करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जातात. यासाठी फेब्रुवारी अखेरीस 'उत्पन्न वाढवा' या विशेष अभियानाची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्याने एसटी प्रवाशांची संख्या घटली. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी एसटीची 'उत्पन्न वाढवा' अभियान आता कागदावरच राहिली आहे.
एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, प्रवाशांना कार्यक्षम, तत्पर प्रवासी सेवा उपलब्ध व्हावा. यासाठी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत 'उत्पन्न वाढवा' विशेष अभियानाची सुरुवात 1 मार्चपासून केली. उत्पन्न वाढविण्यासाठी 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीत प्रत्येक आगाराने जोमाने सुरुवात केली. या दरम्यान, कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यात वाढला. कोरोनाच्या भीतीने एसटी प्रवाशांनी प्रवास करणे टाळले. त्यामुळे राज्यभरातील एसटीच्या दररोज हजारो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसटी महामंडळाचे दररोज कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले.
'उत्पन्न वाढवा' अभियानाच्या कालावधीत उत्पन्न बुडल्याने एसटीचे हे अभियान सध्या बंद केले आहे. 1 मार्च ते 10 मार्च हे अभियान सुरू होते. मात्र आता कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेवर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
असे होते अभियान
'उत्पन्न वाढवा' हे अभियान १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार होते. एसटीच्या २५० आगारांची प्रदेशानिहाय विभागणी केली गेली होती. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा दोन लाख, द्वितीय आगारास रुपये दीड लाख व तृतीय आगारास एक लाख अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. महामंडळाच्या ३१ विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना देखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक दोन लाख, द्वितीय क्रमांकास दीड लाख व तृतीय क्रमांकास एक लाख २५ हजार असे बक्षिसे देण्यात येणार होते. तसेच, या अभियानाअंतर्गत जे आगार निकृष्ट कामगिरी करतील, त्या आगारातील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचे कारवाई केली जाणार होती.