coronavirus: यूजीसीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक , विद्यार्थी पेचात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:35 AM2020-07-10T02:35:43+5:302020-07-10T02:38:12+5:30

कोरोना काळात आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी वाटणाऱ्या विद्यार्थी पालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून चिंतेत भर पडली आहे.

coronavirus: student unions aggressive against UGC's decision on exams, students in trouble | coronavirus: यूजीसीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक , विद्यार्थी पेचात

coronavirus: यूजीसीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक , विद्यार्थी पेचात

Next

मुंबई : यूजीसीने सोमवारी जाहीर केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तिढा आणखी वाढला आहे.
कोरोना काळात आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी वाटणाऱ्या विद्यार्थी पालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून चिंतेत भर पडली आहे.
यूजीसीच्या या सुधारित मार्गदर्शक सूचनांवर विद्यार्थी संघटना ही तितक्याच आक्रमक झाल्या आहेत. महामारीच्या काळात परीक्षा महत्त्वाची वाटते का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय? डिजिटल डिव्हाइडचा बळी ठरलेल्या वंचितांचं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत
आहेत. एकीकडे विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या असताना दुसरीकडे विद्यार्थी हतबल आणि पालक चिंताग्रस्त झाले आहेत. पदवी भविष्यातील संधीसाठी महत्त्वाची असली तरी जीवाची बाजी लावून ती मिळविण्यात काय अर्थ आहे? अशा प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गाकडून येत आहेत.

विद्यार्थी संघटना प्रतिक्रिया
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत यूजीसीचा निर्णय हा निंदनीय आहे. यूजीसीकडून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. भाजप व संलग्न संघटनांकडून करण्यात येत असलेल्या गलिच्छ राजकारणाविरोधात विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले पाहिजे. कोरोनावर लस निघत नाही व मुंबई ग्रीन झोन घोषित होत नाही तोपर्यंत सर्व परीक्षांवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकावा.
- रोहित ढाले, मुंबई अध्यक्ष छात्रभारती

यूजीसीच्या गाईडलाइन्सनुसारच राज्याने परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, आता यूजीसीच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे राजकारण होऊ नये. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळून भाजप काही साध्य करू पाहत असेल तर यापेक्षा नीच राजकारण होऊ शकत नाही. कोणत्या आधारावर यूजीसीने हा निर्णय घेतला ते स्पष्ट करावे.
- वरूण सरदेसाई, सरचिटणीस, युवासेना

गृहमंत्रालयाने अंतिम वर्षाच्या व एटीकेटीच्या परीक्षा घेण्यासाठी मान्यता देऊन हिरवा कंदील दाखविला असला तरी सद्यपरिस्थितीत हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेला प्रहार विद्यार्थी संघटना विरोध करणार असून परीक्षेच्या निर्णयाला आमचा काळा झेंडा आहे.
- मनोज टेकाडे,
अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या राजकारणात सामान्य विद्यार्थी भरडला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ होणार असेल तर यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकूनसुद्धा दाखवू हीच आमची भूमिका आहे.
- सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडण्ट युनियन

यूजीसीच्या नवीन गाईडलाइन्स आमच्यासाठी धक्काच आहे. ज्या वेळी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सध्यपरिस्थितीपेक्षा कमी होती तेव्हा परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता यूजीसीच्या या नवीन सूचना म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुद्दाम लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालण्यासारखे आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने आमच्या मानसिकतेचा विचार करावा हीच विनंती आहे
- प्रथमेश शिंदे,
टीवायबीकॉम,
मुंबई विद्यापीठ

यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना अनाकलनीय आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतन परीक्षा रद्दचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. त्याच धर्तीवर राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता यूजीसीच्या सुधारित सूचना कशासाठी? राज्य सरकारने विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा आणि कार्यवाही करावी
- स्नेहल कांबळे, अंतिम वर्ष,
विधी विभाग, मुंबई विद्यापीठ

परीक्षा घ्या किंवा घेऊ नका... दोन्हीपैकी एक निर्णय सरकारने जाहीर करावा. आधीच लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या विद्यार्थी-पालकांच्या मानसिकतेची परीक्षा यंत्रणांनी घेऊ नये ही विनंती आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पदवीचे महत्त्व खूप असते; मात्र त्यासाठी त्यांचा जीव पणाला लावायचा का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणी घ्यायची? याचा निर्णय घेऊन आता सरकारने परीक्षांच्या बाबतीतील निर्णय जाहीर करावा.
- नीलम पाष्टे,
टीवायबीए,
मुंबई विद्यापीठ

Web Title: coronavirus: student unions aggressive against UGC's decision on exams, students in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.