Join us

Coronavirus : धारावी पॅटर्नच्या यशासाठी जागतिक बँकेने थोपटली मुंबई महानगरपालिकेची पाठ    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 8:28 PM

Coronavirus In Dharavi news : धारावी पॅटर्नच्या या यशाची दखल आता थेट जागतिक बँकेने घेतली आहे. प्रतिबंधक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. 

मुंबई - गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. मात्र आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये रुग्ण संख्या अद्याप नियंत्रणात आहे. धारावी पॅटर्नच्या या यशाची दखल आता थेट जागतिक बँकेने घेतली आहे. प्रतिबंधक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. 

कोरोनामुक्तीच्या धारावी पॅटर्नचे कौतुक संपूर्ण जगात केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, वॉशिंग्टन पोस्ट यांनी धारावीप्रमाणे कोरोना विरुध्द लढा देण्याचा सल्ला अन्य देशांना दिला. त्यावर अंमल करीत धारावीत यशस्वी ठरलेली ' चेस द व्हायरस ' ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे. अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख लोकसंख्या, अशा धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार गेले तीन महिने नियंत्रणात असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

मुंबईत ११ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळून आला, त्यांनतर तीन आठवड्यांनी धारावीत रुग्ण सापडला. शासकीय यंत्रणा, लोकसहभाग आणि खाजगी वैद्यकीय क्लिनिकच्या माध्यमातून धारावीतील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली. वेळीच रोगाचे निदान व तात्काळ उपचारामुळे जुलै २०२० मध्ये धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली, असे निरीक्षण 'द्विवार्षिक गरीबी आणि सामायिक समृद्धी' अहवालात जागतिक बँकेने नोंदविले आहे. 

असा आहे धारावी पॅटर्न....

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रसार रोखणे आव्हानात्मक ठरत होते. परंतु, संस्थात्मक विलगीकरण, जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तात्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात धारावीला यश आले. 

धारावीमध्ये एप्रिल ते ७ ऑक्टोबरपर्यंत ३२८० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १९२ सक्रिय रुग्ण आहेत.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई