Join us

Coronavirus: कोरोना युद्धात मुंबईला मिळाली ‘सुपर मशीन’; आता दुप्पट क्षमतेने होणार लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:15 AM

सध्या शहरातील खासगी व सार्वजनिक प्रयोगशाळा एका दिवसात २२०० नमुन्यांची चाचणी घेत आहेत. हे मशीन एका शिफ्टमध्ये (८ तास) २ हजार नमुन्यांची चाचणी घेऊ शकते.

ठळक मुद्देकोरोनाशी युध्दात मुंबईला सुपर मशीन मिळाली, चाचणी क्षमता दुप्पट होणारअमेरिकेत तयार केलेली ही मशीन नाशिकच्या कंपनीने डीएमईआरला दिली८ तासांच्या एका शिफ्टमध्ये २ हजार नमुना चाचणी, दोन शिफ्टमध्ये दुप्पट क्षमता

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं जगातील बहुतांश देशात संकट उभं केलं आहे. भारतात आतापर्यंत २९ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८५० हून अधिक मृत्यू झाले आहेत. यात देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात ८ हजार ५०० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३५० हून अधिक मृत्यू झाले आहेत.

राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या मुंबईत ५ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुंबईत कोरोनाला मात देण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे टेस्टिंग, जितक्या जास्त प्रमाणात तपासणी केली जाईल तितक्याच लवकर कोरोनाच्या लढाईत जिंकू शकतो. या लढाईत मुंबईला मोठं हत्यार मिळालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या मेडिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च विभागाला अमेरिका निर्मित मशीन उपलब्ध झाली आहे जी कोविड १९ च्या तपासणीची क्षमता दुपटीने वाढवू शकते.

थर्मो फिशर क्वांट स्टूडिया नावाच्या या मशीनला मुंबईतील जे जे रुग्णालयात बसवण्यात आलं आहे. ज्यामुळे हे हॉस्पिटल देशातील सर्वात मोठं कोरोना टेस्टिंग सेंटर बनलं आहे. एका दिवसात २ हजार नमुने तपासणारी मशीन नाशिकमधील दातार कॅन्सर जेनेटिक्सने काही वर्षापूर्वी आयात केली होती. या मशीनची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. कंपनीने ही मशिन डीएमईआरला मोफत दिली आहे.

सध्या शहरातील खासगी व सार्वजनिक प्रयोगशाळा एका दिवसात २२०० नमुन्यांची चाचणी घेत आहेत. हे मशीन एका शिफ्टमध्ये (८ तास) २ हजार नमुन्यांची चाचणी घेऊ शकते. डबल शिफ्टमध्ये काम करताना ४ हजार नमुने तपासणे शक्य आहे. 'दातार कॅन्सर जेनेटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन दातार म्हणाले की, ही एक मल्टिपर्पज मशीन आहे, जी आठ तासांच्या शिफ्टमध्ये २ हजार नमुन्यांची चाचणी घेऊ शकते. जर पूल टेस्टिंग घेण्यास परवानगी दिली गेली तर, एका शिफ्टमध्ये १० हजार नमुने चाचण्या केल्या जाऊ शकतात. जर तेथे अधिक कर्मचारी काम करत असतील तर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये अधिक काम केले जाऊ शकते.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मशीन सुरुवातीला एक हजार नमुन्यांची चाचणी करीत असे, परंतु नंतर त्याची क्षमता वाढली. मुंबई महानगर प्रदेशातील विविध केंद्रांवरील नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी स्लॉट ठरवण्यात येतील. आम्ही रायगड जिल्हा, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि इतर केंद्रांसाठी वेळ निश्चित करणार आहोत. त्यामुळे याचा बॅकलॉग भरून काढता येईल असं त्यांनी सांगितले.

जेजे हॉस्पिटल्सच्या लॅब ऑफिसरने सांगितले की, मशीन बसविण्यात आले होते पण पार्टिक्युलर आरएनए एक्सट्रॅक्शन किटची वाट पहात आहे. आम्हाला आमच्या छोट्या मशीनमध्ये वापरत असलेला आरएनए एक्सट्रॅक्शन किट या मशीनमध्ये वापरता येणार नाही. म्हणून आम्ही ते बाहेरून मागवत आहोत. एकदा ते आल्यावर चाचणी सुरू केली जाऊ शकते.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई