Coronavirus : घरी राहण्याच्या सक्तीनंतरही संशयित फिरत आहेत मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:18 AM2020-03-22T01:18:04+5:302020-03-22T01:18:15+5:30
Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना १५ दिवस घरात राहण्यास बजावण्यात आले आहे. मात्र, हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही असे काही जण मुंबईत बिनधास्त फिरत आहेत, अशा तक्रारी आता पालिकेच्या हेल्पलाइनवर येऊ लागल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये लोकांचे चिंतेचे, तक्रारीचे तब्बल दहा हजार फोन पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे आले आहेत. येथे उपस्थित डॉक्टर नागरिकांच्या शंकेचे निरसन करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांची शंका दूर करून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेने १९१६ हा टोल फ्री क्रमांक ६ मार्चपासून उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या आठवड्यात नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी आणि माहिती जाणून घेण्यासाठी सुमारे साडेचारशे ते सातशे फोन आले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण दररोज सरासरी १,१०० फोन कॉलवर गेले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दररोज एक हजार कॉल असे येत आहेत.
परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी पालिका, राज्य सरकार आणि विमानतळ प्रशासनाच्या डॉक्टरांकडून थर्मल स्क्रिनिंगद्वारे सुरू आहे. यामध्ये लक्षणे दिसली नाहीत, तरी प्रवाशांच्या हातावर शिक्का मारून १४ दिवस होम क्वारंटाइन म्हणजे त्यांचे घरगुती अलगीकरण करण्यात येते. या काळात त्यांनी घरातच एकांतवासात राहणे गरजेचे असते. मात्र, यामधील अनेक लोक बिनधास्त मुंबईत फिरत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात येत आहेत. अशा लोकांची माहिती तातडीने संबंधित विभागातील पोलिसांना कळवून त्यांना सक्तीने पालिकेने सुविधा केलेल्या क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात येत आहे.