Join us

coronavirus: लक्षणे, सहव्याधी नसलेल्यांना रुग्णालयात दाखल करू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:32 AM

कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने, खाटांच्या योग्य नियोजनासाठी महापालिकेने सोमवारी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पालिका, शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वॉर्ड वॉर रूममार्फतच रुग्णांना दाखल केले जाईल,

मुंबई : कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने, खाटांच्या योग्य नियोजनासाठी महापालिकेने सोमवारी सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पालिका, शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वॉर्ड वॉर रूममार्फतच रुग्णांना दाखल केले जाईल, तर लक्षणविरहित व अन्य आजार नसलेल्यांना  रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात येऊ नये, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले.वाढत्या काेराेना रुग्णांमुळे पालिका व खासगी रुग्णालयांत आता ३० टक्केच खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील ८० टक्के कोविड खाटा आणि शंभर टक्के अतिदक्षता विभागातील खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या. प्रत्येक बाधिताला गरजेनुसार रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी स्थानिक विभाग कार्यालयातील वॉर रूमवर असेल. वॉर रूमला न कळवता, रुग्ण दाखल करून घेता येणार नाही.८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने खाटांची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांना, तसेच त्यांना कोणताही अन्य आजार नसल्यास पालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊ नये. दाखल केले असल्यास, तत्काळ डिस्चार्ज द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई